१६ मार्च १९६२ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा शुक्रवार’ होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावर बार्बाडोसला तो सराव सामना होता. चार्ली ग्रिफिथचे उसळते चेंडू वेगाने अंगावर येत होते. नरी कॉन्ट्रॅक्टर आत्मविश्वासाने खेळत होते. तोच ग्रिफिथचा एक भयानक चेंडू कॉन्ट्रॅक्टर यांच्या उजव्या कानाजवळ आदळला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पुन्हा कधीही उभे राहिले नाही. थोडय़ाच वेळात बिनधास्त विजय मांजरेकर मैदानावर आले. ग्रिफिथने पुन्हा तसाच चेंडू टाकला आणि त्याने मांजरेकरांच्या नाकाचा वेध घेतला. क्षणार्धात त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. ते ड्रेसिंगरूममध्ये परतले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. आपली दृष्टी गेली, असे वाटून ‘‘अरे देवा हे काय झाले? मला काहीच दिसेनासे झाले!’’ असा धावा त्यांनी केला. भारतीय कॅम्पमध्ये घबराट पसरली होती. पण सुदैवाने २० मिनिटांनी मांजरेकर सावरले आणि त्यांना पुन्हा दिसायला लागले आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर मांजरेकर दुसऱ्या डावात आत्मविश्वासाने खेळले. त्या वेळी कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या वेळी पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे आणि सर फ्रँक वॉरेल यांनी त्यांना रक्त दिले होते. तो काळ वेगळा होता, त्या वेळी फलंदाजांकडे आजच्यासारखी सुरक्षासामग्री नव्हती. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याला हेल्मेटशिवाय सामना करायला फलंदाज मैदानावर जायचे, तेव्हा जिवंत परतु की नाही याची खात्री त्यांना नसायची, असे ‘त्या’ पिढीचे क्रिकेटपटू सांगतात. फिलिप ह्य़ुजेसच्या घटनेमुळे आता क्रिकेटला कमालीचा धक्का बसला आहे. फलंदाज अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही. शरीराच्या अजूनही काही जागांवर चेंडू लागल्यामुळे जबर दुखापत होऊ शकते की जी कदाचित प्राणावरसुद्धा बेतू शकते, हे वास्तव क्रिकेटमध्ये समोर आले. याच वर्षी हेल्मेटचा कुचकामीपणा आणखी एकदा सिद्ध झाला आहे. वरुण आरोनच्या चेंडूवर हेल्मेटच्या ग्रिलमधून त्या वेळी चेंडूने स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकाचा वेध घेतला होता.
ताज्या घटनेत शॉन अॅबॉटचा उसळता चेंडू (बाऊन्सर) ह्य़ुजेससाठी जीवघेणा ठरला. उसळता चेंडू हे वेगवान गोलंदाजांचे ब्रह्मास्त्र. आखूड टप्प्याचा चेंडू जो फलंदाजाच्या खांद्यापासून ते डोक्यापर्यंत किंवा क्वचितप्रसंगी त्याहून अधिक उंचीने फलंदाजापर्यंत येतो. फलंदाज हा चेंडू बचावात्मक किंवा आक्रमक पद्धतीने खेळू शकतो. परंतु त्याचा सामना करण्यासाठी फलंदाजाने चेंडूला नजरेच्या टप्प्यातून सोडता कामा नये. तसे झाल्यास फलंदाज जखमी होण्याची शक्यता असते. ह्य़ुजेसच्या बाबतीत जे घडले, तो अपघातच होता. त्यामुळेच अॅबॉट खलनायक ठरला नाही. उलट आपल्या गोलंदाजीमुळे ह्य़ुजेसचा मृत्यू झाला, या भावनेने त्याला अपराध्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे त्याच्याविषयीही सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.
उसळते चेंडू किती टाकावे, याबाबत आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियम केले आहेत. तर डोक्याचा वेध घेऊन टाकल्या जाणाऱ्या बिनटप्प्याच्या ‘बीमर’ चेंडूला आयसीसीने बंदी घातली आहे. सुरक्षेची सामग्री दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत चालली आहेत. परंतु १९३२-३३च्या सुमारास तशी परिस्थिती नक्की नव्हती. त्या वेळी ‘बॉडीलाइन’ गोलंदाजीचे षड्यंत्र रचल्याचा इतिहास क्रिकेटमध्ये धगधगतो आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन धावांचा पाऊस पाडत होते. त्यांना वेसण घालण्यासाठी इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डिनने वेगवान गोलंदाज हेराल्ड लारवूडला ‘बॉडीलाइन’ म्हणजेच शरीरवेधी गोलंदाजी करण्यास सांगितले. परंतु ही शक्कल यशस्वी ठरली नाही, तर जार्डिन आणि लारवूड हे या अखिलाडूपणामुळे खलनायक ठरले. कारण त्यांच्या कृतीमध्ये घातपाताचा हेतू होता. त्यामुळेच क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा झाली. १९७० आणि ८०च्या दशकांमध्ये उसळत्या चेंडूंचा प्रभावी वापर होऊ लागला. यात वेस्ट इंडिजचा संघ सर्वात अग्रेसर होता.
२००६मधील आणखी एक घटना ऑस्ट्रेलियाच्याच फलंदाजाच्या बाबतीत घडलेली. जस्टिन लँगरचा तो कारकिर्दीतील शंभरावा सामना होता. परंतु मखाया एन्टिनीच्या उसळत्या चेंडूमुळे त्याला इस्पितळात दाखल व्हावे लागले होते. पाकिस्तानचा तेज आणि वादग्रस्त गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या उसळत्या चेंडूंनी गॅरी कर्स्टन आणि ब्रायन लारा यांना जखमी केले होते.
ह्य़ुजेसच्या घटनेप्रसंगी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचे आपत्कालीन व्यवस्थापन प्रकर्षांने दिसून आले. त्याला इस्पितळात पोहोचवण्यासाठी तेथील यंत्रणा विद्युतवेगाने सज्ज झाली. त्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. भारताप्रमाणेच अन्य देशांनीही आपत्कालीन व्यवस्थापनाचा हा धडा ऑस्ट्रेलियाकडून घ्यायला हवा. भारतात जेव्हा राष्ट्रीय दर्जाचे सामने होतात, तेव्हा या व्यवस्थापनाचा अभाव असतो. स्थानिक क्रिकेटमध्ये पुरेशी सुरक्षासामग्रीचाही वापर होताना दिसत नाही. ह्य़ुजेसच्या मृत्यूमुळे क्रिकेट सुन्न झाले असले तरी त्यातून बोध घेत सावरण्याची नितांत आवश्यकता
आहे.