राष्ट्रीय निवड समितीला आता तगडे उमेदवार मिळणार असून भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. चेतन शर्मा, मणिंदर सिंग तसेच शिवसुंदर दास यांसारख्या अव्वल माजी खेळाडूंनी आपापल्या विभागांतून राष्ट्रीय निवड समिती सदस्यासाठी आपले अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पाठवले आहेत.

२३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा (१९१ एकदिवसीय, २६ कसोटी आणि ४ ट्वेन्टी-२०) अनुभव गाठीशी असलेला आगरकर अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. मात्र त्यासाठी त्याला पुन्हा एकदा निवड समिती सदस्यत्वासाठी अर्ज करावा लागणार आहे. आगरकरने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी त्याने राष्ट्रीय निवड समितीसाठी रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. आगरकरची पश्चिम विभागातून निवड झाल्यास, त्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता (तीन विश्वचषक स्पर्धा तसेच २००७मधील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा) अध्यक्षपदासाठी बीसीसीआयला त्याचाच विचार करावा लागणार आहे.

‘‘निवड समिती सदस्यासाठी मी अर्ज केलेला आहे. सदस्य म्हणून काम करण्याचीही माझी इच्छा आहे. भारतीय क्रिकेटची सेवा करता यावी, हाच माझा प्रामाणिक हेतू आहे. सुनील गावस्कर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर यांसारख्या महान क्रिकेटपटूंबरोबर मी खेळलो असून त्यांच्याकडून मला भरपूर काही शिकता आले आहे,’’ असे १९८७च्या विश्वचषकात भारतासाठी हॅट्ट्रिक मिळवणाऱ्या चेतन शर्मा यांनी सांगितले. चेतन शर्मा यांनी ८८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

५४ वर्षीय शर्मा यांनी जानेवारी महिन्यातच निवड समितीसाठी अर्ज केला होता. पण विद्यमान समितीतील दक्षिण विभागाच्या एमएसके प्रसाद यांची जागा सुनील जोशी यांनी घेतली. त्याचबरोबर गगन खोडाच्या जागी हरविंदर सिंगची निवड बीसीसीआयने केली होती.

उत्तर विभागातून माजी डावखुरे फिरकीपटू मणिंदर सिंग यांनीही निवड समितीसाठी अर्ज केला आहे. ‘‘निवड समिती सदस्यासाठी रिंगणात उतरलो असून जानेवारी महिन्यातही मी याच पदासाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने मला संधी दिली तर माझ्यापरीने सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करेन,’’ असे ३५ कसोटी आणि ५९ एकदिवसीय सामने खेळलेल्या मणिंदर यांनी सांगितले.

उत्तर विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘मणिंदर आणि चेतन यांचे अर्ज फक्त स्वागत करण्यापुरते मर्यादित नसून त्याहीपेक्षा मोठे त्यांचे योगदान आहे. गेल्या वेळी १०पेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या सरणदीप सिंगला सदस्यपदी संधी मिळाली होती. हे हास्यास्पद आहे. चेतन आणि मणिंदरसारखे दोन नामवंत क्रिकेटपटू निवड समितीसाठी अर्ज करताहेत, ही खूप मोठी बाब आहे.’’

पूर्व विभागातून शिवसुंदर दास याची निवड समिती सदस्यपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. माजी सलामीवीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या दासने २३ कसोटी सामन्यांत १३२६ धावा केल्या आहेत. दासचा सहकारी आणि माजी वेगवान गोलंदाज देबाशिश मोहंती कनिष्ठ संघाच्या निवड समितीवर असल्यामुळे ओडिसामधील दोघांना कनिष्ठ आणि वरिष्ठ संघाच्या निवड समितीवर ठेवण्यावर बीसीसीआयचा आक्षेप असू शकेल.

‘‘दासने अर्ज केल्यास, त्याच्या नावाचा विचार बीसीसीआयला करावाच लागेल. पण त्या परिस्थितीत बीसीसीआय पुढील दोन वर्षांसाठी मोहंतीसमोर निवड सदस्यपदाचा प्रस्ताव ठेवू शकेल आणि बंगालच्या एका खेळाडूची कनिष्ठ निवड समितीवर निवड करता येईल,’’ असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पूर्व विभागातून माजी मध्यमगती गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी निवड समितीसाठी अर्ज करणार होते. पण या शर्यतीत उडी घेण्याचा त्यांचा विचार नाही. ‘‘सुब्रतो हे अनुभवी गोलंदाजी प्रशिक्षक असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत १९ वर्षांखालील किंवा भारतीय अ संघासोबत राहण्याची त्यांची इच्छा आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. याच विभागातून बंगालचा माजी वेगवान गोलंदाज रणदेब बोस हासुद्धा निवड समितीसाठी अर्ज करणार आहे. मात्र दास आणि बोस असा सामना रंगल्यास, भारताचा माजी सलामीवीर दासचे पारडे जड मानले जात आहे.