25 September 2020

News Flash

इंग्लंड दौरा खडतर-द्रविड

आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतास पाच कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. हा प्रदीर्घ दौरा अतिशय आव्हानात्मक असला, तरी भारताच्या युवा खेळाडूंसाठी ती सुवर्णसंधी आहे.

| June 19, 2014 12:06 pm

आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतास पाच कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. हा प्रदीर्घ दौरा अतिशय आव्हानात्मक असला, तरी भारताच्या युवा खेळाडूंसाठी ती सुवर्णसंधी आहे. विशेषत: द्रुतगती गोलंदाजांना तेथील वातावरण व खेळपट्टी याचा फायदा घेता येईल. स्टुअर्ट बिन्नी याला संधी मिळाली तर त्याने या संधीचा पुरेपूर लाभ उठविला पाहिजे. इंग्लंडमधील प्रेक्षकही भारतीय खेळाडूंचे चाहते असतात त्यामुळे तेथे खेळणे हे नेहमीच रंजक असते, असे द्रविड यांनी सांगितले.
प्रथम दर्जाच्या क्रिकेट कारकीर्दीस मी येथील नेहरू स्टेडियमवरच प्रारंभ केला व तेथूनच माझी क्रिकेट कारकीर्द घडली. त्यामुळे पुण्याचे ऋण मी कदापिही विसरणार नाही असे ज्येष्ठ क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी येथे सांगितले.
शक्ती स्पोर्ट्सच्या पुण्यातील नव्या शाखेचे उद्घाटन द्रविड यांच्या हस्ते झाले. या वेळी एसजी कंपनीचे पुनीत आनंद, शक्ती स्पोर्ट्सचे संचालक सुनील व अनिल कालरा हे उपस्थित होते.
या वेळी द्रविड यांनी सांगितले, १९९४-९५ मध्ये मी येथे महाराष्ट्राविरुद्ध रणजी सामना खेळलो होतो. त्या वेळी महाराष्ट्राच्या मिलिंद गुंजाळ, संतोष जेधे, सुरेंद्र भावे, शंतनु सुगवेकर यांच्याविरुद्ध खेळताना मी फलंदाजीतील अनेक बारकावे आत्मसात केले व हीच शिदोरी मला पुढील कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरली. साहजिकच जेव्हा जेव्हा मला पुण्यात येण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा मी या संधीचा लाभ घेत असतो.
क्रिकेटमधील दुसऱ्या इनिंगविषयी विचारले असता द्रविड म्हणाले, राजस्थान रॉयल्स संघाचा प्रशिक्षक म्हणून मला थेट मैदानावरील घडामोडींशी नाते जोडता येते. समालोचक म्हणूनही मी खेळाचा आनंद चांगल्या रीतीने घेऊ शकत आहे. सध्या तरी या दोन्ही भूमिकांमध्ये काम करण्यास मला आवडेल.
जेतेपदासाठी ब्राझीलला अधिक पसंती
आता संसाराची जबाबदारी माझ्यावर अधिक असल्यामुळे रात्री जागून फुटबॉलचे सामने पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेविषयी अंदाज व्यक्त करणे अधिक कठीण आहे. तथापि माझी पसंती यजमान ब्राझील देशास जास्त आहे. अंतिम सामना ब्राझील व अर्जेन्टिना यांच्यात होईल असे द्रविड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:06 pm

Web Title: bowlers hold the key for india in england says rahul dravid
Next Stories
1 इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सायनाची विजयी सलामी
2 जागतिक जलद बुद्धिबळ : आनंदची तिसऱ्या स्थानावर झेप
3 विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, सेरेना अग्रमानांकित
Just Now!
X