बोक्साम बॉक्सिंग स्पर्धा

भारताच्या सहा वेळा विश्वविजेत्या एम. सी. मेरी कोमने (५१ किलो) बुधवारी बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

३७ वर्षीय मेरीने वर्षभरानंतर झोकात पुनरागमन करताना उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या गिओर्डाना सारेंटिनोचा विभाजीत निकालद्वारे पराभव केला. उपांत्य फेरीत तिची अमेरिकेच्या व्हर्जिनिया फ्यूशशी गाठ पडणार आहे.

त्याआधी, जागतिक कांस्यपदक विजेत्या मनीष कौशिकने स्पेनच्या अमारी रुडॉल्फला ५-० अशी धूळ चारली. उपांत्यपूर्व सामन्यात त्याची दोन वेळच्या आशियाई सुवर्णपदक विजेत्या कझाकस्तानच्या सुफिउल्लीन झाकीरशी गाठ पडणार आहे.

दरम्यान, मेरी कोमची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) विजेत्या आणि ज्येष्ठांच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गतवर्षी डिसेंबरमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली असून जगभरात बॉक्सिंगमध्ये नाव कमावलेल्या अनुभवी खेळाडूंचा या समितीत समावेश करण्यात येतो.