बोक्साम बॉक्सिंग स्पर्धा

सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या एमसी मेरी कोमला संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ३७ वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले. दोघींनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर पंचांनी फच्सच्या बाजूने कौल दिला. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा बाळगला. पण दुसऱ्या फेरीत मेरीने अधिक आक्रमक खेळ केला. तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी एकमेकींना ठोसे लगावले. पण मेरीला अधिक ठोसे मारल्यामुळे पंचांनी फच्स हिला विजयी घोषित केले.

तत्पूर्वी, सतीश कुमार (९१ किलोवरील) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. सतीशने डेन्मार्कच्या गिवस्कोव्ह नील्सनला ५-० असे, तर आशीषने इटलीच्या रेमो सल्वातीला ४-१ असे पराभूत केले.

सिमरनजित कौर (६० किलो) तसेच जास्मिन (५७ किलो) आणि  पूजा राणी (७५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. जास्मिनने इटलीच्या सिरिन चाराबी हिला तर सिमरनजितने प्यूएटरे रिकोच्या किरिया तापिया हिला हरवले. पूजाने पनामाच्या अथेयना बायलॉन हिच्यावर वर्चस्व गाजवले.