केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना मध्यस्थीसाठी पत्र

नवी दिल्ली : माजी जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेता बॉक्सिंगपटू गौरव बिधुरीने ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेच्या निवड प्रक्रियेला आव्हान दिले आहे. या प्रकरणी त्याने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना मध्यस्थीसाठी पत्र लिहिले आहे.

क्रीडामंत्री, भारतीय बॉक्सिंग महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना लिहिलेल्या पत्रात बिधुरीने म्हटले आहे की, २९ आणि ३० डिसेंबरला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेपासून मला दूर ठेवून अन्याय करण्यात आला आहे.

‘‘ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्यांना थेट प्रवेश देण्यात आला. परंतु मी २०१७मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले असतानाही मला राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांसाठी स्थान देण्यात आले नव्हते,’’ असे बिधुरीने सांगितले.

‘‘माझ्याकडे पुरेसा स्पर्धात्मक अनुभव नसल्याचे त्या वेळी मला सांगण्यात आले. परंतु आता मला बलाढय़ प्रतिस्पध्र्याशी सामना न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवड प्रक्रिया काय आहे, हे कुणी मला सांगू शकेल का,’’ असा सवाल बिधुरीने केला आहे.

चीन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत बिधुरी ५७ किलो वजनी गटात सहभागी होऊ इच्छितो. अमित पंघाल (५२ किलो), मनीष कौशिक (६३ किलो) या विश्वविजेत्या खेळाडूंना निवड चाचणी स्पर्धेची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.