बॉक्सिंग चाहत्यांना येथे अकरा जून रोजी व्यावसायिक लढतीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. या लढतीत भारताचा विकास कृष्णन हा केनियाच्या निक्सन अबाका याच्याशी खेळणार आहे.
विकास याने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. अबाका याने जागतिक सैन्यदल स्पर्धामध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. जुलै महिन्यात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून विकासला ही लढत खूप उपयोगी ठरणार आहे.
विकास म्हणाला, व्हेनेझुएला येथे जुलै महिन्यात होणारी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा माझ्यासाठी अखेरची संधी आहे. त्यामुळे अबाका याच्याविरुद्धच्या लढतीत मी सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही लढत पाच फेऱ्यांची असल्यामुळे अबाका याच्यासारख्या बलाढय़ खेळाडूचे कौशल्य मला आजमावता येणार आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला दोन व्यावसायिक लढतींमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे. मी यापूर्वी उजबेकिस्तानमध्ये एका लढतीत सहभागी झालो होतो. तेथे मला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र अबाकाविरुद्धच्या लढतीत मी विजयी होईन.
या लढतीच्या दुसऱ्या दिवशी विकास याच्यासह भारताचे नऊ खेळाडू अझरबैजानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना होणार आहेत. याबाबत विचारले असता विकास म्हणाला,‘‘ बॉक्सिंग खेळात करिअर करणे म्हणजे प्रत्येक क्षणाला धोका पत्करावा लागतो. दुखापती केव्हांही होऊ शकतात. त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र अबाकाविरुद्धच्या लढतीमुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यासाठी मदत होईल.’’