विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मेलबर्न कसोटीत आश्वासक खेळ केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपवण्यात भारताला यश आलं. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद सिराज यांच्या माऱ्यासमोर कांगारुंचा डाव कोलमडला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन, वेड आणि हेड यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक खेळी करु शकला नाही.

जसप्रीत बुमराहने या सामन्यात ४, आश्विनने ३ तर सिराजने २ बळी घेतले. पदार्पणाच्या कसोटीत आश्वासक कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजची भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान श्रीधर यांनी सिराजचं खास हैदराबादी बोलीत…एकमद मौत डाल दिये मियाँ असं म्हणत त्याचं कौतुक केलं.

या मुलाखतीत सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायला मिळणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचं सांगितलं. पहिल्या सत्रापर्यंत मला बॉलिंगची संधी मिळाली नाही. पण अज्जु भाई (अजिंक्य रहाणे) माझ्याशी बोलत होता. ज्यावेळी माझी वेळ आली त्यावेळी त्याने मला तयार रहा असं सांगितलं. डॉट बॉल टाकून समोरच्या फलंदाजांवर दडपण वाढवण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्यात मला यश आल्याचंही सिराज म्हणाला.