बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघानं पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं १-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या ३७३ धावांच्या विजयी लक्ष्यापुढे पाकिस्तान संघला २७१ धावांपर्यंत मजल मारता आली. फवाद आलम (१०२) आणि अझर अली (६०) यांचा अपवाद वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

न्यूझीलंडकडून टीम साऊदी, ट्रेंड बोल्ट, वॉग्नर, मिचेल सँटनर आणि जेमिनसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला पहिल्या डावांत फक्त २३९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडनं दुसरा डाव १८० धावांवर घोषित करुन पाकिस्तानला विजयासाठी ३७३ धावांचं लक्ष दिलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ २७१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

पाकिस्तान संघाकडून फवाद आलम यानं एकाकी झुंज दिली. फवादनं २००९ मध्ये पहिलं कसोटी शतकं झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल ११ वर्षानंतर फवादला दुसरं कसोटी शतक झळकावता आलं आहे.

आणखी वाचा- उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, वॉर्नरसह हुकुमी एक्के संघात परतले

साऊदीचे बळींचे त्रिशतक!
टिम साऊदीने कसोटी क्रिकेटमधील तीनशे बळींचा टप्पा गाठला. रिचर्ड हॅडली (४३१ बळी) आणि डॅनियल व्हेटोरी (३६१ बळी) यांच्यानंतर बळींचे त्रिशतक झळकावणारा साऊदी हा न्यूझीलंडचा तिसरा आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील ३४वा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या ७६व्या कसोटीत हा टप्पा गाठला.