लॉस एंजेलिस : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) कार्यकारिणीच्या स्थापनेत गदारोळ झाला तर बॉक्सिंग या खेळाचे ऑलिम्पिकमधील भवितव्य धोक्यात येईल, अशा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) बुधवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या आगामी निवडणुकीत सर्व समस्यांवर तोडगा काढा अन्यथा बंदीला सामोरे जा, अशा स्पष्ट शब्दांत आयओसीने इशारा दिला आहे. ‘‘एआयबीएच्या सद्य:स्थितीतील कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुकीतील उमेदवारांची यादी आणि एआयबीएच्या सदस्यांची परस्परविरोधी वक्तव्ये यामुळे फक्त संघटनेची प्रतिमाच नव्हे तर बॉक्सिंग या खेळावरही त्याचा परिणाम होऊ शकतो,’’ असे आयओसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘‘आयओसीच्या आचारसंहितेनुसार जर एआयबीएच्या आगामी निवडणुकीत जर समाधानकारक तोडगा काढण्यात आला नाही तर २०२० ऑलिम्पिकमधून बॉक्सिंग हा खेळ वगळण्यात येईल त्याचबरोबर एआयबीएला असलेली आयओसीची मान्यता काढून घेण्यात येईल,’’ असेही आयओसीने म्हटले आहे.

उझबेकिस्तानचे उद्योजक गफूर रखीमोव्ह हे एआयबीएच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असून अमेरिकेच्या वित्त विभागातील संघटित गुन्ह्य़ामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मॉस्को येथे निवडून येणाऱ्या निवडणुकीत ते निवडून आले तर एआयबीएवर बंदी येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात एआयबीएच्या घटनेत बदल करण्यात आल्यामुळे आयओसीने एआयबीएला देण्यात येणारी आर्थिक रसद रोखली आहे.