आयर्लंडचा संघ ११ ते १५ मे दरम्यान आपला पहिलावहिला कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना आयर्लंडमधील डबलीन येथे पाकिस्तनविरुद्ध खेळला जात आहे. आयर्लंड या संघासाठी जरी हा त्यांचा पहिलाच कसोटी सामना असला, तरी या संघातील एक खेळाडू मात्र या आधीही कसोटी सामना खेळला आहे.

आयर्लंडच्या कसोटी संघात निवड झालेला हा खेळाडू आहे बॉईड रँकिन. रँकिन हा आयर्लंड या संघाकडून खेळण्याआधी इंग्लंडच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. रँकिन याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात आयर्लंड संघापासूनच झाली. २००७ ते २०१२ या कालावधी दरम्यान रँकिन आयर्लंड संघाकडून खेळत होता. ऑगस्ट २०१२मध्ये त्याने आयर्लंडची साथ सोडली. त्यानंतर २०१३ -१४ मध्ये त्याने इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१६मध्ये तो पुन्हा आयर्लंडच्या संघात परतला.

कसोटी कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या अॅशेस कसोटी मालिकेत त्याने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. रँकिनला या मालिकेत केवळ एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने १३ धावा केल्या आणि १ बळी टिपला. त्यानंतर २०१६ पर्यंत त्याला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे तो फेब्रुवारी २०१६पासून पुन्हा आयर्लंड संघामध्ये परतला.

आयर्लंडच्या संघाला जून २०१७मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाला. या आधी त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची परवानगी नव्हती. मात्र २०१७ मध्ये त्यांना कसोटी संघाचा दर्जा प्राप्त झाला. आता पाकिस्तनाविरुद्ध आयर्लंड आपली पहिली कसोटी खेळत आहे. मात्र, त्या आधीच संघातील रँकिनच्या नावे देशापेक्षा १ कसोटी जास्त आहे.