पाकिस्तानचा स्फोटक माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा आपल्या क्रिकेट कारकिर्दीत धमाकेदार खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो इतर स्पर्धांमध्ये मैदान गाजवत आहे. नुकतेच त्याने बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली.
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तो स्टीव स्मिथच्या नेतृत्वाखालील कोमिला विक्टोरियाकडून खेळत आहे. त्यात रविवारी झालेल्या सामन्यात आफ्रिदीने २५ चेंडूत ३९ धावांची दमदार खेळी केली. ३९ धावांच्या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार खेचला. तसेच एक षटक निर्धाव टाकत एक बळी घेतला. त्याच्या या आक्रमक खेळीच्या बळावर कोमिला विक्टोरिया संघाने डेविड वार्नरच्या नेतृत्वाखालील सिल्हेट सिक्सर्सला रोमांचक सामन्यात पराभूत केले. याबरोबरच त्याने ४ हजार धावा आणि ३०० बळी घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. तर देशभरातील तिसरा अष्टपैलू खेळाडू ठरला.
या यादीत विंडीजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा अव्वल आहे. ब्राव्होने ६ हजार ८२ धावा आणि ४६४ गडी बाद केले आहेत. याशिवाय बांगलादेशचा शाकिब अल हसनही आफ्रिदीच्या पुढे आहे. त्याने ४ हजार ४४५ धावा करत ३२२ बळी घेतले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2019 1:02 pm