भारताच्या युवा ब्रिगेडनं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ च्या पराकानं धूळ चारत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर चोहोबाजूनं कौतुकांचा वर्षाव होत आहे. अनेक कठीण प्रसंगावर मात करत भारतीय संघानं विजय खेचून आणला. या ऐतिहासिक विजायाचा आनंद भारतीय साजरे करत आहेत. अशातच ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडबरोबर कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लडच्या संघातील खेळाडू भारतामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या मालिकापूर्वी, कोणता संघ बाजी मारणार? याची भाकितंही सुरु झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉज यानंही या मालिकेची भविष्यवाणी केली आहे.  ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉजच्या मते या कसोटी मालिकेवर भारतीय संघ निर्वादित वर्चस्व मिळवणार आहे. भारतीय संघ ही मालिका ३-० किंवा ३-१ च्या मोठ्या फरकानं जिंकणार असल्याचं भाकित ब्रॅड हॉज यानं आपल्या युट्यूब चॅनलवरल एका व्हिडीओत केलं आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओत ब्रॅड हॉज म्हणाला की, ‘माझ्यामते भारतीय संघ ही कसोटी मालिका ३-० किंवा ३-१ च्या फराकानं जिंकेल. अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (डे-नाईट कसोटी सामना) इंग्लंडचा संघ वरचढ ठरु शकतो. पण भारतीय संघ पुनरागमन करु शकतो. अहमदाबाद येथे होणाऱ्या अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाचाच विजय होईल.चेन्नई येथे होणाऱ्या दोन्ही कसोटी सामन्यात भारतीय संघ एकहाती विजय मिळवू शकतो. भारतीय संघानं इंग्लंडचा पराभव करुन लॉर्ड्सवर होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाता दिसेल. ‘

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ४ सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर १३ फब्रुवारी रोजी चेन्नईतच दुसरा सामना होणर आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे अखेरचे दोन कसोटी सामने होणार आहेत.

आणखी वाचा –

हार्दिक, इशांतचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर