नेयमारने साकारलेल्या विजयी गोलच्या बळावर ब्राझीलने विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पध्रेत कोलंबियाचा २-१ असा पराभव केला.

बार्सिलोनाचा आघाडीचा फुटबॉलपटू नेयमारने ७४व्या मिनिटाला बरोबरीची कोंडी फोडणारा गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला. २०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात २४ वर्षीय नेयमारला दुखापत झाली होती.

वर्षभरापूर्वी चिलीमध्ये कोपा अमेरिका स्पध्रेत या दोन प्रतिस्पध्र्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती. त्यात नेयमारला चार सामन्यांची बंदी झाली होती.

या सामन्यात इंटर मिलानचा बचावपटू मिरांडाने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मिरांडाने आपल्या ३१व्या वाढदिवशी पहिलावहिला आंतरराष्ट्रीय गोल साकारला. मग कोलंबियाने बरोबरी साधण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. पहिले सत्र संपण्यासाठी नऊ मिनिटे बाकी असताना माक्र्यून्होसने कोलंबियाचे खाते उघडले.

या विजयामुळे ब्राझीलचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पाच वेळा विश्वविजेत्या ब्राझीलने ८ सामन्यांत १५ गुण कमावले आहेत. उरुग्वेचा संघ एका गुणाच्या फरकाने आघाडीवर आहे, तर अर्जेटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

 

पोर्तुगालला पराभवाचा धक्का

पॅरिस : दुखापतग्रस्त ख्रिस्तियानो रोनाल्डोची उणीव पोर्तुगालला आता तीव्रपणे जाणवू लागली आहे. २०१८मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेसाठीच्या पात्रता फेरीत मंगळवारी स्वित्र्झलडने युरोपियन विजेत्या पोर्तुगालला २-० अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला.

बेसेलच्या सेंट जेकॉब पार्कवर झालेल्या ब- गटाच्या लढतीत स्वित्र्झलडच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात सात मिनिटांच्या अंतराने दोन गोल नोंदवले. ब्रील एम्बोलोने २३व्या मिनिटाला पहिला गोल केला, मग अ‍ॅडमिर मेहमेदीने ३०व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

अ- गटात युरो उपविजेत्या फ्रान्सला बेलाररूसने ०-० असे बरोबरीत रोखले, तर नेदरलँड्सने स्वीडनशी १-१ अशी बरोबरी साधली. स्वीडनच्या मार्कस बर्गने ४३व्या मिनिटाला गोल केला. त्याला प्रत्युत्तर देताना ६७व्या मिनिटाला वेस्ले स्नायडरने गोल साकारला. निकोसिया येथे रोबटरे मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच सामन्यात बेल्जियमने सायप्रसचा ३-० असा धुव्वा उडवला. रोमेलू ल्युकॅकूने १३व्या आणि ६१व्या मिनिटाला असे दोन गोल झळकावले, तर यानिक कॅरास्कोने ८१व्या मिनिटाला तिसरा गोल केला.