News Flash

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : ब्राझीलच्या चमूत दुखापतग्रस्त नेयमार

प्रशिक्षक टिटे यांनी हा संघ जाहीर करताना नेयमारचे पुनरागमन संघाचे मनोबल उंचावणारे असल्याचे सांगितले,

नेयमारच्या खेळाच्या जोरावर विक्रमी सहावे जेतेपद पटकावण्याचा निर्धार ब्राझीलने केला आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अर्जेटिना, मेक्सिको, ऑस्ट्रेलियाचे संभाव्य संघ जाहीर

रिओ दी जानिरो : रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे आणि स्पर्धेतील प्रत्येक सहभागी संघ जगातील सर्वोत्कृष्ट चषक उंचावण्यासाठी सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्यास सज्ज झाला आहे. संभाव्य संघाची कटकट न ठेवता स्पर्धेत उतरणाऱ्या अंतिम २३ खेळाडूंची यादी मंगळवारी ब्राझील संघाने जाहीर केली. ब्राझीलने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये दुखापतीमुळे तीन महिन्यांपासून एकही सामना न खेळलेल्या नेयमार हा चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र नेयमारच्या खेळाच्या जोरावर विक्रमी सहावे जेतेपद पटकावण्याचा निर्धार ब्राझीलने केला आहे. ब्राझीलपाठोपाठ अर्जेटिना, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियानेही आपले संघ जाहीर केले.

प्रशिक्षक टिटे यांनी हा संघ जाहीर करताना नेयमारचे पुनरागमन संघाचे मनोबल उंचावणारे असल्याचे सांगितले, परंतु त्याचवेळी राइट-बॅक डॅनी अल्व्हेस याची अनुपस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अ‍ॅल्व्हेसच्या जागी प्रशिक्षकांनी मँचेस्टर सिटीच्या डॅनिलोला संधी दिली. या संघात आणखी एक दुखापतग्रस्त खेळाडू फॅग्नेरला संधी देत टिटे यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला, परंतु संघाचे डॉक्टर रॉड्रिग्रा लॅस्मर यांनी फॅग्नेर तंदुरुस्त असल्याचे सांगितले. ब्राझीलचा पहिला सामना १७ जूनला स्वित्र्झलडविरुद्ध होणार आहे.

कायद्याच्या कचाटय़ात सापडलेला मार्किझ मेक्सिकोच्या चमूत

मेक्सिको : अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या राफेल मार्किझची विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संभाव्य २८ खेळाडूंच्या मेक्सिको संघात निवड करण्यात आली आहे. ३९ वर्षीय मार्किझ वैयक्तिक पाचव्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असला तरी त्याच्या निवडीने अनेकांनी आक्षेप घेतला आहे. मेक्सिकोच्या अंतिम २३ खेळाडूंची नावे स्कॉटलँड विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यानंतर २ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात मार्किझ दोषी ठरला होता आणि त्यानंतर तो तीन महिने फुटबॉलपासून दूर होता. मात्र प्रशिक्षक जुआन कार्सोस ओसारिओ यांनी या गोष्टीकडे कानाडोळा करण्याचे सर्वाना सुचवले आहे. ते म्हणाले, ‘‘मैदानाबाहेर कोणते वादविवाद सुरू आहेत, याकडे मी लक्ष देत नाही. तो एक चांगला फुटबॉलपटू असून संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकतो.’’

डीबाला, इकार्डी अर्जेटिनाच्या संभाव्य संघात

इंटर मिलानचा आक्रमणपटू मौरो इकार्डी आणि युव्हेंटसचा पाऊलो डीबाला यांचा अर्जेटिनाच्या संभाव्य ३५ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. अर्जेटिनाचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांनी मंगळवारी ही घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे लिओनेल मेसी, सेर्गिओ अ‍ॅग्युरो आणि एंजल डी मारिया यांचाही समावेश त्यात आहे. २१ मे रोजी अर्जेटिना अंतिम २३ जणांचा संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.

जेमी मॅक्लेरनला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळले

सिडनी : हिबेर्नियन क्लबकडून खेळताना मागील आठवडय़ात हॅट्ट्रिक आणि १३ सामन्यांत आठ गोल करूनही जेमी मॅक्लेरनची विश्वचषक स्पर्धेसाठीच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झालेली नाही. प्रशिक्षक बर्ट व्हॅन मार्विक यांनी संभाव्य २६ खेळाडूंची नावे मंगळवारी जाहीर केली. त्याशिवाय बेली राइट, गोलरक्षक मिच लँगरॅक, अ‍ॅलेक्स गेर्शबॅच, अपोस्टोलोस गिनौयू आणि अ‍ॅलेक्सँडर सुस्नर यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. मात्र टिम चाहिल आणि मार्क मिलिगन यांनी सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलियाचा अंतिम २३ जणांचा चमू ३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

कोएंट्राओ आणि सांचेस यांना पोर्तुगाल संघात स्थान नाही

लिस्बन : फॅबीयो कोएंट्रोओ आणि रेनाटो सांचेस यांना पोर्तुगालच्या संभाव्य ३५ जणांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. प्रशिक्षक फर्नाडो संटोस यांनी पोर्तुगालच्या संभाव्य संघाची घोषणा केली. २०१६च्या युरो स्पर्धेच्या विजयी संघातील प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, पेपे, विलियम काव्‍‌र्हालो, जोआओ माँटीन्हो, नानी आणि रिकाडरे क्युरेस्मा यांचे अंतिम २३ जणांमधील स्थान पक्के समजले जात आहे.

दुखापतग्रस्त नॉयरवर जर्मनीचा विश्वास

डोर्टमंड : दुखापतग्रस्त मॅन्युएल नॉयरवर जर्मनीच्या संघाने विश्वास दाखवला असून आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य २७ खेळाडूंमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. मात्र २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी गोल करणाऱ्या मारियो गोत्झेला संघात स्थान दिलेले नाही. सप्टेंबर २०१७पासून नॉयर खेळत नसून त्याच्या तंदुरुस्तीची पुढील आठवडय़ात चाचणी करण्यात येणार आहे. नॉयरसह प्रशिक्षक जोकीम लो यांनी अन्य तीन गोलरक्षकांना स्थान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:58 am

Web Title: brazil announce world cup 2018 squad with neymar
Next Stories
1 विश्वचषक स्पर्धेत कोणी एक दावेदार नसतो!
2 ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीला मार्क वॉची सोडचिठ्ठी
3 बँक्रॉफ्टला स्थानिक क्रिकेट खेळण्यास परवानगी
Just Now!
X