पिछाडीवरून मुसंडी मारताना जर्मनीवर २-१ असा विजय

पहिल्या सत्रातील पिछाडी.. मध्यंतरातील ‘त्या’ आठ मिनिटांनी सामन्याला मिळालेले नाटय़मय वळण.. भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला जर्मनीकडून सातत्याने झालेले प्रयत्न.. आणि पंचाच्या शिटीनंतर ब्राझिलच्या खेळाडूंनी साकारलेले पारंपरिक ‘सांबा’ नृत्य.. कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि जर्मनी या बलाढय़ संघांमध्ये रंगलेली ही चढाओढ. या चढउतारांच्या शर्यतीत तीन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या ब्राझिलने २-१ अशी सरशी साधली. उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडच्या म्हणजेच आणखी एका युरोपियन आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर ब्राझिलच्या खेळाडूंना भरभरून पाठिंबा मिळत असतानाही जर्मनीने गोल खाते उघडले आणि पहिल्या ४५ मिनिटांत माजी विजेत्यांना झुंजवले. गोल करण्यात सातत्याने येत असलेल्या अपयशाने प्रशिक्षक कार्लोस अमाडेयू यांनाही रागावर नियंत्रण राखता आले नाही. ३० मिनिटांनी घेतलेल्या विश्रांती वेळेत त्यांनी खेळाडूंची चांगलीच कानउघडणी केली आणि त्यानंतरची १५ मिनिटे ब्राझिलच्या खेळात सुधारणा झालेली पाहायला मिळाली. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला ब्राझिलला आघाडी मिळली असती, परंतु अ‍ॅलनने जर्मनीच्या खेळाडूंना चकवून गोलजाळीच्या दिशेने टोलावलेल्या चेंडून गोलरक्षकाला चकवले. मात्र तो गोलखांब्याला लागून माघारी परतला. गोल झालाच असे समजून मदानाबाहेर जल्लोष करण्यासाठी तयार असलेल्या ब्राझिलच्या राखीव खेळाडूंनीही लगेच स्वत:ला आवरले. त्यानंतर जर्मनीचेच वर्चस्व दिसले. २०व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर जर्मनीचा कर्णधार जॅन फिएट अर्पने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. चार मिनिटानंतर त्यांना या आघाडीत भर घालण्याची संधी होती, परंतु एलियस एबौचाबाकाने उजव्या बाजूने तटवलेला चेंडू गोलजाळीच्या बाजूने गेला.

मध्यंतरानंतर सामन्याचे चित्र जणू पालटले. ब्राझिलच्या पिछाडीमुळे निराश झालेल्या प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला आणि त्याचाच फायदा घेत ब्राझिलने दमदार पुनरागमन केले. ७१व्या मिनिटाला अ‍ॅलनच्या पासवर वेव्हर्सनने अप्रतिम गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर बरोबर सहा मिनिटांनी पॉलिन्होने आणखी एका गोलची भर घातल ब्राझिलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आठ मिनिटांच्या या नाटय़मय कलाटणीनंतर सॉल्ट लेक स्टेडियमवरील वातावरणही बदलले.   भरपाई वेळेच्या आठ मिनिटांतील अखेरच्या काही सेकंदांत जर्मनीला बरोबरी साधण्याची वारंवार संधी मिळाली, परंतु ब्राझिलने त्यांना रोखले आणि उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला.

ब्राझील                      जर्मनी

२                                १

वेव्हरसन ७१’         जॅन-फिएट अर्प २१’

पॉलिन्हो ७७’

 

गोल’वीर

५ गोल

अ‍ॅमिने गॉयरी (फ्रान्स),

लसाना एंडाये (माली)

जॅन-फिएट अर्प (जर्मनी)

४ गोल

किटो नाकामुरा (जपान)

रियान ब्रेवस्टर (इंग्लंड)

अ‍ॅबेल रुईझ (स्पेन)

 

उपांत्य फेरी

२५ ऑक्टोबर

ब्राझील वि. इंग्लंड

वेळ : सायं. ५ वा.

स्थळ : गुवाहाटी

माली वि. स्पेन

वेळ : रात्री ८ वा.

स्थळ : नवी मुंबई</p>

 

स्पेनकडून इराणचा पराभव

वृत्तसंस्था, कोची

चेंडूवर कमी ताबा मिळवूनही गोल करण्यासाठी साधली जाणारी अचूकता आणि बचावपटूंचे कौशल्य याच्या बळावर कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत ऐतिहासिक मजल मारणाऱ्या इराणचे आव्हान रविवारी संपुष्टात आले. युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांमध्ये आशियाची खिंड लढवणाऱ्या इराणला उपांत्यपूर्व फेरीत स्पेनने पराभूत केले. तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या स्पेनने ३-१ फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर गतउपविजेत्या मालीचे आव्हान असणार आहे.

पराभूत होऊनही इराणचे खेळाडू मायदेशात ताठ मानेने परतणार आहेत.  कुमार विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात इराणने पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आणि ही बाब त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नक्की प्रेरणादायी आहे.

 

स्पेन                                                  इराण

 ३                             १

अ‍ॅबेल रुईझ       १३’                    सईद करिमी ६९’

सर्जिओ गोमेझ   ६०’

फेरान टोरेस       ६७’