News Flash

ब्राझीलला कांस्यपदक

मालीचा गोलरक्षक युसूफ कोईटाने सोपा गोल अडवण्यात दाखवलेला गलथानपणा ब्राझीलच्या पथ्यावर पडला.

गॅब्रिएल ब्राझाओ

मालीच्या गोलरक्षकाचा गलथानपणा पथ्यावर; अ‍ॅलन डिसुझा व युरी अल्बटरे यांचे गोल

माजी विजेता ब्राझील आणि गतउपविजेता माली यांच्यात कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण अमेरिकेच्या संघाने बाजी मारली. मालीचा गोलरक्षक युसूफ कोईटाने सोपा गोल अडवण्यात दाखवलेला गलथानपणा ब्राझीलच्या पथ्यावर पडला. अ‍ॅलन डिसुझाने पेनल्टी क्षेत्राबाहेरून अगदी सहज गोलजाळीच्या दिशेने चेंडू टोलावला. सरपटत येणारा हा चेंडू सहज अडवू अशा मुद्रेत कोईटा पुढे आला, परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू उसळी घेत गोलजाळीत विसावला. काही वेळासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनाही हा गोल झाल्याचे आश्चर्य वाटले. त्यानंतर मनोबल खचलेल्या मालीकडून अपेक्षित खेळ झालाच नाही. युरी अल्बटरेने ब्राझीलच्या गोलखात्यात भर घालत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेचा शेवट गोड करून भारताचा निरोप घेण्यासाठी उत्सुक असलेल्या माली आणि ब्राझीलकडून चुरशीचा खेळ अपेक्षित होता. पहिल्या सत्रात मालीने दाखवलेला लढाऊ  बाणा मध्यंतराच्या गोलनंतर हरपला. गोलरक्षक गॅब्रिएल ब्राझाओचा ब्राझीलच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्याने मालीचे गोल करण्याचे १० प्रयत्न अडवले. त्याउलट कोईटाला एकच गोल अडवण्यात यश आले. कोलकातातील फुटबॉल चाहत्यांनी ब्राझीलवर भरभरून प्रेम केले. उपांत्य फेरीतील अपयशानंतर त्यांनी कांस्यपदकाच्या सामन्यात उपस्थित प्रेक्षकांना निराश केले नाही. पहिल्या सत्रातील खेळात माली वरचढ होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अंतिम स्वरूप मिळाले नाही.

मध्यंतरानंतर ब्राझीलले संघात बदल केला. रॉड्रिगो गुथऐवजी व्हिक्टर बॉबसीनला पाचारण करण्यात आले. या बदलाने ब्राझीलच्या चमूत चैतन्य संचारले आणि तीन मिनिटांनंतर त्यांचे गोलखाते उघडले. अ‍ॅलनने टोलावलेला चेंडू कोईटाला सहज अडवता आला असता, परंतु त्याच्याकडून चूक झाली आणि ५५व्या मिनिटाला ब्राझीलने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मालीच्या चमूत नैराश्याचे वातावरण दिसले. परंतु तरीही त्यांच्याकडून गोल करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरूच होते. त्यांना ब्राझाओची अभेद्य बचाव भिंत ओलांडण्यात अपयश आले. ८८व्या मिनिटाला अल्बटरेने सुरेख गोल करून ब्राझीलला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

ब्राझील                                           माली

२                                                     ०

अ‍ॅलन डिसुझा ५५’

युरी अल्बटरे ८८’’

१२,८०,४५९ : भारतात पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या फिफा कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेने प्रेक्षकसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. शनिवारच्या अंतिम लढतीसाठी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर ५६ हजार ४३२ प्रेक्षक उपस्थित होते. या उपस्थितीबरोबर संपूर्ण स्पर्धेतील एकूण प्रेक्षसंख्या १२ लाख ८० हजार ४५९ इतकी झाली. यापूर्वी १९८५मध्ये चीनमध्ये झालेल्या कुमार विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात १२ लाख ३० हजार ९७६ प्रेक्षकांची उपस्थिती होती. हा विक्रम मोडण्याचा पराक्रम भारतीयांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 3:54 am

Web Title: brazil beat mali claim u 17 world cup bronze
Next Stories
1 French Open Super Series Badminton – किदम्बी श्रीकांतची अंतिम फेरीत धडक, एच.एस. प्रणॉयवर केली मात
2 FIFA U-17 World Cup – अंतिम सामन्यात इंग्लंडची स्पेनवर ५-२ ने मात
3 Pro Kabaddi Final – गतविजेत्या पाटणा पायरेट्सची विजयाची हॅटट्रिक, अंतिम फेरीत गुजरातवर मात
Just Now!
X