पाच वेळा फिफा विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या ब्राझीलच्या प्रशिक्षकपदावरून मॅनो मेनेझेस यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे मायदेशात २०१४मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेआधी ब्राझीलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
‘‘मी स्वत:हून ही बातमी जाहीर करत आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची बातमी लोकांसमोर आणणे, हे कुणालाही आवडणारे नाही. पण फुटबॉलमध्ये अशा गोष्टी घडतात, हे प्रत्येकालाच माहीत आहे. नव्या प्रशिक्षकाची घोषणा जानेवारी महिन्यात केली जाईल,’’ असे ब्राझिलीयन फुटबॉल संघराज्याचे राष्ट्रीय संघाचे संचालक आन्द्रेस सान्चेस यांनी सांगितले.
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आल्यानंतर डुंगा यांना प्रशिक्षकपदावरून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर मेनेझेस यांची प्रशिक्षकपदी वर्णी लागली होती. २०११ कोपा अमेरिका स्पर्धेत पॅराग्वेकडून हरल्यानंतर आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यामुळे मेनेझेस यांच्यावरील दबाव वाढला होता. संघराज्याचे अध्यक्ष जोस मारिया मारिन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर मेनेझेस यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
२००२मध्ये ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणारे लुइस फिलिप स्कोलारी यांची प्रशिक्षकपदी निवड होईल, अशी जोरदार चर्चा आहे. ‘‘महत्त्वाच्या स्पर्धेतील निकालानंतर प्रत्येक प्रशिक्षकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागतेच. प्रतिष्ठेच्या स्पर्धाची जेतेपद मिळवून दिली तरी ब्राझीलसारख्या देशात प्रशिक्षकाची स्तुती केली जात नाही. यावरून संघ हरल्यावर किती टीका होत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. एका स्पर्धेतील निकालावरून अशी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. ऑलिम्पिकमधील पराभवाने ब्राझीलला सहावा विश्वचषक जिंकण्याची प्रेरणा मिळेल, असे मला वाटते,’’ असे मेनेझेस यांनी सांगितले.