ब्राझील व स्पेन हे दोन्ही संघ ‘फुटबॉलसम्राट’ मानले जातात. या दोन देशांमधील लढतीबाबत फुटबॉलरसिकांना औत्सुक्य असतेच. सुरुवातीला ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या माजी विजेत्या ब्राझीलने २-१ अशी सरशी साधली व कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत झकास सलामी दिली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाचव्याच मिनिटाला वेस्लीच्या स्वयंगोलमुळे ब्राझीलला धक्का बसला आणि स्पेनने आघाडी मिळवली, मात्र फुटबॉल हा श्वास मानणाऱ्या ब्राझीलच्या खेळाडूंनी हा धक्का संयमपणाने पचवला. २५व्या मिनिटाला त्यांच्या लिनकॉनने खणखणीत फटका मारला व १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्ध संपण्यापूर्वी काही सेकंद बाकी असताना ब्राझीलच्या पॉलिन्होने माकरेस अन्तोनिओच्या पासवर अचूक फटका मारला व संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात ब्राझीलला यश मिळाले.

स्पेन संघाच्या पराभवास त्यांच्याच खेळाडूंनी गोल करण्याबाबत दाखवलेली अनास्था कारणीभूत ठरली. त्यांना अनेक वेळा गोल करण्याच्या संधी मिळाल्या, मात्र त्याचे गोलात रूपांतर करण्यात आवश्यक असणारी अचूक शैली त्यांच्या खेळाडूंमध्ये दिसली नाही. ब्राझीलच्या खेळाडूंनीही अनेक हुकमी संधी वाया घालविल्या. अर्थात, उत्तरार्धात त्यांनी आक्रमक चालींऐवजी बचावात्मक खेळास प्राधान्य दिले होते. त्यामुळे उत्तरार्धात अपेक्षेइतका रंगतदार खेळ दिसून आला नाही.

ड गट
ब्राझील                             स्पेन
२                                        १
लिनकॉन २५’              वेस्ली ५’ (स्वयंगोल)
पॉलिन्हो ४५’+१’

नायजरचे विजयी पदार्पण
कोची : कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नायजरचा संघ विजयी पदार्पण करण्यात यशस्वी ठरला. त्यांनी उत्तर कोरियाचा १-० असा पराभव केला. विश्वचषकातील पहिल्यावहिल्या सामन्यात खेळणाऱ्या नायजरच्या सलीम अब्दुरहमानीने ५९व्या मिनिटाला साकारलेला गोल महत्त्वाचा ठरला. हबिबोऊ सोफीयानीने त्याला साहाय्य केले. नायजरने सामन्याला आक्रमक पद्धतीने प्रारंभ केला. इब्राहिम बॉबाकारने सुरुवातीच्या मिनिटांत केलेला प्रयत्न कोरियाच्या गोलरक्षकाने हाणून पाडला. मग १०व्या मिनिटाला हबिबोऊ सोफियानीने आणखी एक अपयशी प्रयत्न केला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक नामी संधी गमावल्या.

ड गट
नायजर                                      उत्तर कोरिया
१                                                 0
सलीम अब्दुरहमानी ५९’

इराणकडून गिनीचा पराभव
मडगाव : धारदार आक्रमणाच्या जोरावर इराणने गिनी संघाला ३-१ असे हरवत कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी केली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून अनेक चाली होऊनही गोलफलक कोराच होता. सामन्याच्या ५९व्या मिनिटाला अलाहियार सय्यदने गोल करीत इराणचे खाते उघडले. त्यानंतर ७०व्या मिनिटाला मोहम्मद शरिफीने त्यांचा आणखी एक गोल केला. याच फरकाने इराण विजयी होणार असे वाटले होते. परंतु ९०व्या मिनिटाला त्यांच्या सईद करिमीने संघाचा तिसरा गोल नोंदवला. पाठोपाठ गिनीच्या फँडजे टॉरेने खणखणीत गोल करीत सामन्यात रंगत निर्माण केली.

क गट
इराण                                                    गिनी

३                                                            १
अल्लाहयार सय्यद ५९’                फँडजे टॉरे ९०’+१’
मोहम्मद शरिफी ७०’
सईद करिमी ९०’