News Flash

नव्या युगाची आशा!

‘‘सध्याच्या ब्राझील संघात प्रतिष्ठेच्या स्पर्धाचे जेतेपद पटकावण्याची क्षमता नाही. मोठय़ा स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करण्याइतपत हा संघ सक्षम नाही,’’ अशी टीका ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी

| July 2, 2013 05:21 am

‘‘सध्याच्या ब्राझील संघात प्रतिष्ठेच्या स्पर्धाचे जेतेपद पटकावण्याची क्षमता नाही. मोठय़ा स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करण्याइतपत हा संघ सक्षम नाही,’’ अशी टीका ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतु ब्राझीलच्या खेळाडूंनी चोख त्यांना उत्तर देत रविवारी कॉन्फेडरेशन चषकावर नाव कोरले. फोफावलेला भ्रष्टाचार, वाहतुकीच्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे त्रस्त असलेल्या ब्राझीलवासियांच्या दु:खावर कॉन्फेडरेशन चषकाच्या जेतेपदासह ब्राझील संघाने फुंकर घातली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गेली काही वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या आणि महासत्ता होऊ पाहणाऱ्या स्पेनचे ब्राझीलने गर्वहरण केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलने बलाढय़ प्रतिस्पध्र्यासाठी खडतर आव्हान निर्माण केले असून, स्पेनचे उंच भरारी घेणारे ‘यशोविमान’ जमिनीवर आणले.
कॉन्फेडरेशन चषकाची अंतिम लढत ब्राझील आणि स्पेन यांच्यातच होणार, असे अंदाज फुटबॉलपंडितांनी मांडले होते. अपेक्षेप्रमाणेच उभय संघांमध्ये अंतिम मुकाबला रंगला. पण २००८, २०१२मध्ये युरोपियन अजिंक्यपद आणि २०१०मध्ये फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेनचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काहीसा सुखदायी ठरला नव्हता. तुल्यबळ उरुग्वेला सहज पराभूत केल्यानंतर स्पेनने दुबळ्या ताहिती आणि नायजेरियाचा धुव्वा उडवला होता. पण इटलीसारख्या मातब्बर संघाविरुद्ध उपांत्य फेरीत विजय मिळवताना त्यांच्या नाकी नऊ आले होते. पेनल्टी-शूटआऊटमध्ये नशिबाची साथ लाभल्यामुळे स्पेनने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याउलट गेल्या पाच-सहा वर्षांत बदलांचे वारे अनुभवणाऱ्या आणि गमावण्यासारखे काहीही नसलेल्या ब्राझीलने दिमाखात पुनरागमन करून बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
स्पेनचा संघ आपल्या संग्रहात नसलेल्या एकमेव कॉन्फेडरेशन चषक जेतेपदासाठी उत्सुक होता. पण कोणताही संघ परिपक्व नसतो. प्रत्येक संघात काही कच्चे दुवे असतात, असे म्हटले जाते. २००२मध्ये ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक लुइझ फिलिप स्कोलारी यांना स्पेनचे गर्वाचे घर रिकामी कसे करायचे, हे पक्के ठाऊक होते. स्पेनचे कच्चे दुवे त्यांनी अचूक हेरले होते. सुरुवातीलाच हल्ले चढवून गोल करायचे आणि भक्कम बचावाद्वारे स्पेनची आक्रमणे रोखायची, या स्कोलारी यांच्या चाली पटावर अचूक पडत गेल्या आणि यजमान ब्राझील कॉन्फेडरेशन चषकाचे राजा झाला.
स्पेनचे दिग्गज खेळाडू वि. ब्राझीलचे युवा शिलेदार.. स्पेनचा गोलरक्षक आयकर कॅसिल्लास वि. नेयमार असाच हा सामना रंगला. स्कोलारी यांच्या ४-३-२-१ या रणनीतीप्रमाणे ब्राझीलच्या बचावरक्षकांनी भक्कम तटबंदी उभी करत स्पेनच्या आक्रमकवीरांना चाली रचण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीलाच पिछाडीवर पडलेल्या स्पेनने प्रतिहल्ले चढवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. पण त्यात अपयशी ठरल्याने ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. स्पर्धेआधी फॉर्मात नसलेल्या पण पाच गोल झळकावणाऱ्या फर्नाडो टोरेसवर स्पेनने आघाडीवीर म्हणून विश्वास दाखवला. पण ‘टिकी-टाका’ शैलीनुसार (झटपट पासिंग आणि चेंडूवर कमी वेळ ताबा ठेवण्याची पद्धत) खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्पेनला आक्रमक चाली रचता आल्या नाहीत. त्यामुळे टोरेसअस्त्र काहीच करू शकले नाही. स्पेनच्या या फसलेल्या रणनीतीचा फायदा उठवत ब्राझीलचा एकमेव स्टार खेळाडू नेयमार आणि मध्य आघाडीवीर फ्रेड यांनी कॅसिल्लासला निष्प्रभ केले.
गेल्या दोन विश्वचषकांमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होण्याची ब्राझीलवर नामुष्की ओढवली. २०१०च्या विश्वचषकानंतर ब्राझील संघात बदलांचे वारे वाहू लागले. दोन प्रशिक्षकांची उचलबांगडी आणि स्टार खेळाडूंच्या दुखापती यामुळे ब्राझील संघ अडचणीत सापडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्कोलारी यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर संघबांधणीपासून कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. प्रशिक्षकपदाच्या अनुभवाचा खजिना गाठीशी असलेल्या स्कोलारी यांनी काही महिन्यांतच युवा खेळाडूंना घेऊन ब्राझील संघाची बांधणी केली. युवा आणि अननुभवी खेळाडूंच्या कठोर मेहनतीला कॉन्फेडरेशन चषकाच्या रूपाने पहिले यश लाभले आहे. ‘नव्या युगाची आशा’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पण मायदेशातच पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकाचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 5:21 am

Web Title: brazil hope of the new age
टॅग : Brazil,Football
Next Stories
1 सेरेनाला पराभवाचा धक्का
2 हार के बाद ही जीत है..
3 पुण्यात अ‍ॅथलेटिक्सचा महासंग्राम!
Just Now!
X