फुटबॉल विश्वचषक आता अवघ्या महिन्याभरावर आला आहे. फुटबॉलच्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे दोन जगप्रसिद्ध खेळाडू ब्राझीलमध्ये अवतरणार आहेत. या दोघांचा खेळ पाहण्यासाठी जगभरातले फुटबॉलरसिक आतुर आहेत. विश्वचषकाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या ब्राझीलची घरच्या कार्यासाठी लगबग उडाली आहे. आपापल्या क्लबचे प्रतिनिधित्व करणारे जगभरातले अव्वल फुटबॉलपटू आता देशासाठी खेळताना दिसणार आहेत. विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत यजमान ब्राझीलचा मुकाबला क्रोएशियाशी होणार आहे. या लढतीने संयोजनाबाबत सुरू असलेल्या सगळ्या चर्चाना पूर्णविराम मिळेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. ३२ संघांचा सहभाग असलेल्या विश्वचषकाचे आयोजन करताना ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याची चर्चा आहे. ४२४ दशलक्ष डॉलर्स एवढय़ा प्रचंड रकमेच्या स्टेडियमची उभारणी ही ब्राझीलसाठी चिंतेची समस्या ठरली होती. स्टेडियमची निर्मित्ती होत असताना अजस्र आकाराची क्रेन पडून दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आणखी एका अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. ६८,००० प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणारे हे स्टेडियम डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम न झाल्याने फिफाने १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत आठ व्यक्तींना स्टेडियम उभारणीत प्राण गमवावे लागले आहेत.
‘आम्ही कठीण कालखंडातून जात आहोत. विश्वचषक यशस्वी करण्यासाठी आम्ही ब्राझीलला सर्वतोपरी साहाय्य करत आहोत. विश्वचषकाचे यशाभोवतीच फिफाचे कामकाज चालते. जर विश्वचषकाचे आयोजनात गफलती झाल्या तर फिफा अडचणीत येईल,’ असे फिफाचे सरव्यवस्थापक जेरोम व्हालके यांनी सांगितले.
दरम्यान ब्राझीलने विश्वचषकासाठी तब्बल ११ दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे. आरोग्य आणि सार्वजनिक व्यवस्थेचा बोजवारा उडालेल्या देशात एवढी प्रचंड रक्कम क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी दिल्याने ब्राझीलमध्ये  लोकांमध्ये रागाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचार बोकाळला आहे. सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ३२ देशांचे संघ, प्रशिक्षक आणि सहयोगी, पदाधिकारी, माध्यमकर्मी, विविध देशांतून आलेले चाहते या सगळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १, ५०,००० पोलीस आणि सैनिक तसेच २०,००० खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.