रिओ दी जानेरो : गतविजेत्या ब्राझिलने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेला दमदार विजयासह प्रारंभ केला. मात्र शुक्रवारी पहाटे होणाऱ्या ‘ब’ गटातील पेरू संघाविरुद्धच्या लढतीत त्यांना विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागू शकतो. नेयमारच्या चमकदार कामगिरीमुळे ब्राझिलने पहिल्या सामन्यात व्हेनेझुएलावर ३-० असे वर्चस्व गाजवले. दुसरीकडे पेरूचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. यजमान ब्राझिलने २०१९मध्ये अंतिम फेरीत पेरूला ३-१ नमवून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे पेरू संघ त्या पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल. गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी पेरूला एकच लढत जिंकता आल्याने त्यांच्यावर कामगिरी उंचावण्याचेही दडपण असेल. तत्पूर्वी, गुरुवारी मध्यरात्री कोलंबिया आणि व्हेनेझुएला आमनेसामने येतील. कोलंबियाने पहिल्या लढतीत इक्वाडोरला १-० असे नमवले. तर व्हेनेझुएला स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

५२ जण करोनाबाधित

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेशी संबंधित ५२ जणांना करोनाची लागण झाल्याचे ब्राझिल आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. यामध्ये ३३ खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील सदस्यांचा समावेश आहे. व्हेनेझुएला संघातील आठ जणांना करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्या संघात नव्या १५ खेळाडूंना सामील करण्यात आले. मात्र यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन ब्राझिल शासनाने दिले आहे.