News Flash

‘कोपा अमेरिका’ला ब्राझिलचा विरोध

एकूण १० संघांत खेळली जाणारी ही स्पर्धा १३ जून ते १० जुलैदरम्यान रंगणार आहे.

वृत्तसंस्था, रिओ दी जानेरो

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो यांनी सहमती दर्शवली असली, तर ब्राझिलच्या फुटबॉल संघानेच या स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या या स्पर्धेच्या आयोजनावरील प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे.

एकूण १० संघांत खेळली जाणारी ही स्पर्धा १३ जून ते १० जुलैदरम्यान रंगणार आहे. कोलंबिया आणि अर्जेटिना संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होते. परंतु विविध कारणांस्तव दोघांनाही यजमानपदाचा हक्क गमवावा लागला. त्यानंतर ब्राझिलने पुढाकार घेतल्यामुळे दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने ब्राझिलला स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय घेतला.

मात्र ब्राझिलमधील करोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढत असून तेथील नागरिकांचे लसीकरणही संथ गतीने सुरू आहे. त्याशिवाय करोनाचा आळा घालण्यासाठी शासनाकडून कोणतेही र्निबध लागू न करण्यात आल्यामुळे ब्राझिलमधील जनतेने या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध दर्शवला. त्यामध्ये आता ब्राझिलच्या संघाचीही भर पडली आहे.

ब्राझिलव्यतिरिक्त अर्जेटिना आणि उरुग्वे या बलाढय़ संघांतील काही खेळाडूंनीही कोपा अमेरिकाच्या आयोजनास विरोध दर्शवला असल्याचे समजते. यामध्ये अर्जेटिनाचा सर्जिओ अग्युरो, उरुग्वेचा एडिन्सन कव्हानी, लुइस सुआरेझ यांचा समावेश आहे. ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी मात्र स्पर्धा रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

प्रशिक्षक टिटे यांच्यासह संघातील प्रत्येक खेळाडू कोपा अमेरिकाचे ब्राझीलमध्ये आयोजन करण्याच्या विरोधात आहे. बुधवारी पॅराग्वेविरुद्धचा विश्वचषक पात्रता फेरीतील सामना झाल्यावर आम्ही सर्व खेळाडू अधिक तीव्रतेने आमची बाब महासंघापुढे मांडू. गरज पडल्यास आम्ही सर्वच खेळाडू स्पर्धेतून माघारही घेऊ.

-कॅसेमिरो, ब्राझिलचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 2:00 am

Web Title: brazil opposes copa america football ssh 93
Next Stories
1 भारताला बांगलादेशविरुद्ध विजय अत्यावश्यक
2 टेनिसपटू रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार
3 आरंभ है प्रचंड..! टीम इंडियाच्या खेळाडूंची मैदानी प्रशिक्षणाला सुरुवात
Just Now!
X