ब्राझीलने पिछाडीवरून मुसंडी मारत विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी अर्जेटिनाला १-१ अशा बरोबरीत रोखले. दक्षिण अमेरिकेतील या दोन तगडय़ा प्रतिस्पर्धी संघांमध्ये झालेल्या सामन्यात ब्राझीलच्या लढाऊ बाण्याने सर्वाची मने जिंकली. इझेक्युएल लॅव्हेझीने पहिल्या सत्रात गोल करून अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली होती, परंतु दुसऱ्या सत्रात लुकास लिमाने गोल करून सामना बरोबरीत आणला.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अर्जेटिनाने सुरुवातीपासून आक्रमणावर भर दिला. अनेक संधींनी हुलकावणी दिल्यानंतर ३४व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. लॅव्हेझीने अर्जेटिनाचे खाते उघडले, परंतु त्यांना सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. मध्यंतरानंतर ब्राझीलने अनुभवी खेळाडू डोग्लस कोस्टाला पाचारण केले. कोस्टाच्या आगमनाने संघात चैतन्य संचारले आणि ५८व्या मिनिटाला लिमाने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर सामन्यातील वातावरण तापले आणि शाब्दिक वादापर्यंत खेळाडूंची मजल गेली.
८८व्या मिनिटाला डेव्हिड लुईस याला लाल कार्ड दाखविण्यात आल्याने ब्राझीलला उर्वरित सामना दहा खेळाडूंसहच खेळावा लागला. पुढील आठ मिनिटांच्या खेळात ब्राझीलने अर्जेटिनाचे आक्रमण थोपवून सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या निकालामुळे अर्जेटिनाला दक्षिण अमेरिका गटातील विश्वचषक पात्रता फेरीत तीन सामन्यांत विजयाविनाच समाधान मानावे लागले.