ब्राझीलने फुटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत व्हेनेझुएलावर विजयासह विजयी सलामी दिली. चिली, इक्वेडोर आणि उरुग्वे संघांनीही विजयी आगेकूच केली. दरम्यान, पेराग्वेने अर्जेटिनाला बरोबरीत रोखले. विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत चिलीने ब्राझीलवर विजय मिळवला होता. मात्र या पराभवातून धडा घेत ब्राझीलने व्हेनेझुएलाविरुद्ध दमदार कामगिरी केली. नेयमारविनाही ब्राझीलने सुरेख सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.

सामना सुरू झाल्यानंतर काही सेकंदांत व्हिलानने ब्राझीलसाठी शानदार गोल केला. मध्यंतरानंतर लगेचच व्हिलानने आणखी एक गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. व्हेनेझुएलातर्फे ख्रिस्तियन सँटोसने गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. रिकाडरे ऑलिव्हिराने आणखी एक गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य लढतींमध्ये चिलीने पेरूवर ४-३ असा निसटता विजय मिळवला. उरुग्वेने कोलंबियाचा ३-० असा धुव्वा उडवला. पॅराग्वेने चिवट खेळ करत अर्जेटिनाला गोलशून्य बरोबरीत रोखले.