रिकाडरे इझेस्कोन डॉस सँतोस लेइट या नावाने त्याला कुणी ओळखत नाही.. फुटबॉल विश्वात ‘काका’ या टोपणनावाने तो प्रसिद्ध होता. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनी गेली दहा वष्रे ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कारावर आलटून पालटून नाव कोरले. रोनाल्डो आणि मेस्सीचे पर्व सुरू होण्यापूर्वी हा पुरस्कार उंचावणारा काका हा अखेरचा खेळाडू. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने गेली अनेक वष्रे फुटबॉल क्षेत्रात  वेगळा ठसा उंचावणारा काका  निवृत्त झाला. यापुढे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची इच्छा त्याने प्रकट केली आहे.

विश्वविजेत्या ब्राझील फुटबॉल संघातील माजी खेळाडू काका याने सोमवारी निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मात्र, त्याच वेळी एसी मिलान क्लबसोबत व्यवस्थापक म्हणून काम करणार असल्याचे संकेत त्याने दिले.

‘‘फुटबॉलसोबत मी कायमचा जोडलेलो आहे; पण या वेळी मी वेगळ्या भूमिकेत दिसेन. यापुढे मी व्यावसायिक खेळाडू नसणार आहे. एसी मिलान क्लबसोबत व्यवस्थापक किंवा क्रीडा संचालक म्हणून काम करण्यास उत्सुक आहे,’’ असे २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा काका म्हणाला.

ब्राझीलच्या २००२ सालच्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य असलेल्या काकाने ट्विटरवरुनही निवृत्तीची माहिती दिली. काकाने ब्राझीलमधील साओ पाऊलो येथून फुटबॉल कारकीर्दीला सुरुवात केली. त्याचे कौशल्य पाहून युरोपच्या एसी मिलान क्लबने २००३ मध्ये त्याला करारबद्ध केले. याच क्लबकडून खेळताना त्याने २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार पटकावला.

कारकीर्द

आंतरराष्ट्रीय (ब्राझील)

  • फिफा विश्वचषक (२००२), फिफा कॉन्फडरेशन चषक (२००५ व २००९).

एसी मिलान

  • सीरि ए (२००३-०४), सुपरकोपा इटालियन (२००४), चॅम्पियन्स लीग (२००६-०७), युएफा सुपर चषक (२००७), फिफा क्लब विश्वचषक (२००७)

रिअल माद्रिद

  • ला लिगा (२०११-१२), कोपा डेल रे (२०१०-११)