ब्राझीलचा विश्वचषक विजेत्या संघातील फुटबॉलपटू रोनाल्डिनोने बुधवारी अधिकृत निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय रोनाल्डिनो हा गेल्या दोन वर्षांपासून आंतराष्ट्रीय फुटबॉलपासून दूर आहे.

रोनाल्डिनोचा बंधू आणि समन्वयक रॉबटरे अ‍ॅसिसने त्याच्या निवृत्तीबाबत माहिती देताना सांगितले की, ‘‘रोनाल्डिनो यापुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणार नाही. निवृत्तीनंतर फुटबॉलसाठी खूप काही करण्याची त्याची इच्छा आहे. पुढील वर्षी रशियामध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर तो त्याची भूमिका स्पष्ट करेल.’’

रोनाल्डोने १९९९ ते २०१३ या कालावधीमध्ये ९७ सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ३३ गोल केले. २००२च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघात त्याचा समावेश होता. त्या स्पर्धेत रोनाल्डिनोने दोन गोल केले होते.

आंतरराष्ट्रीय क्लब कारकीर्द ग्रेमिओपासून सुरू करणाऱ्या रोनाल्डिनोने २००३-०८ या पाच वर्षांत बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले. याच काळामध्ये २००५मध्ये रोनाल्डिनोला प्रतिष्ठेच्या ‘बॅलन डी ऑर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.