इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाक क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला होता. पाक क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या करोना चाचणीत एकूण १० खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले होते, तर मंगळवारी आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे वृत्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिले होते. त्यानंतर यापैकी एकाचा करोना अहवाल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये केलेल्या चाचणीत निगेटिव्ह आला. त्यात आता धक्कादायक म्हणजे एकूण १० खेळाडूंपैकी ६ खेळाडूंचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे वृत्त इएसपीएनक्रिकइन्फोने दिले आहे.

आधी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांना करोनी लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या सात जणांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. पण ताज्या माहितीनुसार १० पैकी सहा खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शादाब खान, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि वहाब रियाज यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर हैदर अली, हारीस रौफ, इमरान खान आणि काशिफ भट्टी या चौघांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले.

पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र इंग्लंड दौऱ्यावरील तीन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आता २९ ऐवजी २० जणांचा संघ पाठवण्यात येणार आहे.