धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम रचला आहे. हा मॅक्क्युलमच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असून यामध्ये त्याने अवघ्या ५४ चेंडूत शतकाला गवसणी घातली. याशिवाय, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदविला आहे. मॅक्क्युलमने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक यांचा यापूर्वीचा ५६ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला. तसेच मॅक्क्युलमने षटकार मारण्याचा ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला.
ख्राईस्टचर्च येथे शनिवारपासून न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात झाली. या दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे. मॅक्क्युलमच्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. मॅक्क्युलमने आपली आक्रमक शैली कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यापर्यंत कायम ठेवताना ५४चेंडूत १६ चौकार व ४षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात १४५ धावा केल्या.