वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. या भारत दौऱ्यात ब्रायन लारा याने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. President of India या ट्विटर हँडलवरून या भेटीबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली.

महान क्रिकेटपटू आणि आधुनिक युगातील उत्तम फलंदाज असलेल्या ब्रायन लाराने आज राष्ट्रपती भवन येथे कोविंद यांची भेट घेतली. उदयोन्मुख खेळाडू आणि क्रिकेटपटू यांचा लारा हा आदर्श आहे. त्याचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे, असे या भेटीच्या वेळी राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

या आधी वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याला डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते जुलै २०१९ मध्ये ही पदवी प्रदान करण्यात आली होती. नेरुळ येथे हा पदवीप्रदान समारंभ झाला. भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहील असे त्यावेळी लाराने म्हटले होते. तर विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी ब्रायन लाराच्या भेटीने व त्याच्या खेळावरील प्रचंड प्रेमामुळे खेळासाठी आणखी भरीव कार्य करण्याची नवी ऊर्मी मिळाली असे सांगितले होते.