मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपण म्हटले की प्रत्येक क्रिकेटप्रेमीला त्याचा लहानपणीचा एक फोटो आठवल्याशिवाय राहत नाही. कुरळ्या केसांचा सचिन हातात बॅट घेऊन मस्तपैकी स्टान्स घेऊन उभा आहे, असा तो फोटो साऱ्यांच्या नजरेपुढे आजही येतो. नुकताच अशा फोटोशी मिळता जुळता एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात फोटोतील मुलगा काहीसा सचिनसारखाच बॅट हातात धरून फलंदाजीसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मुलगा साधासुधा नसून एका दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा आहे.
नुकताच एका दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. तो दिग्गज क्रिकेटपटू आपल्या कारकिर्दीत डावखुरा खेळला, पण त्याच्या मुलाने मात्र उजव्या हाताने फलंदाजी करण्यास पसंती दिली. त्या मुलाची आई कॅमेरातून शूटिंग सुरू असताना त्याला बॅट पकडण्याबाबत सल्ला देत होती. पण त्याच दरम्यान चिरमुड्याने बॅट केवळ एका हाताने धरली. दोन्ही हाताने बॅट पकडण्याचा सल्ला चिरमुड्याने धुडकावून लावला आणि तसाच एका हाताने आलेला चेंडू जोरदार टोलवला. हा चिमुरडा आहे दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा मुलगा…
लाराची पत्नी मुलाला फलंदाजीचे सल्ले देताना दिसली, पण मुलाने मात्र ते सल्ले अजिबात ऐकले नाहीत. आपल्या डावखुऱ्या बाबांसारखं तुला खेळायचं नाही का? असा प्रश्नही लाराच्या पत्नीने मुलाला विचारला, पण त्यावरही लाराच्या मुलाने थेट ‘नाही’ असं उत्तर देऊन टाकलं. त्यानंतर लाराने मुलाचा आणि सचिनच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला.
तो फोटो पोस्ट करून लाराने त्याच्या मुलात सचिनच्या लहानपणीच्या फलंदाजी झलक दिसते असं म्हटलं. तसेच सचिनचीदेखील स्तुती केली. सध्या जुने फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू असताना अशा प्रकारे सचिनचा जुना फोटो शेअर झाल्याने क्रिकेटप्रेमीदेखील काहीसे आनंदी झाल्याचे दिसून आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 10:29 am