ब्रिक्स (१७ वर्षांखालील) फुटबॉल स्पध्रेत भारतीय संघाच्या पराभवाची मालिका तिसऱ्या सामन्यातही कायम राहिली. बाम्बोलिम येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या लढतीत कडवी झुंज देऊनही भारताला चीनकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. भरपाई वेळेत हुआंग कोंगने केलेल्या गोलच्या जोरावर चीनने स्पध्रेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

चीनने संपूर्ण सामन्यात भारताच्या बचावफळीवर वर्चस्व गाजवले. सामन्याच्या मध्यंतराला भारताकडून चतुर खेळ पाहायला मिळाला, परंतु यजमानांना त्यावरच समाधान मानावे लागले. २१व्या मिनिटाला कोमल थाटलने १८ यार्डावरून चेंडू गोलजाळीच्या दिशेने तटवला खरा, परंतु तो चेंडू गोलजाळीच्या वरून गेला. दोन मिनिटांनंतर भारताकडून बोरीसने पुन्हा प्रयत्न केला. पण, याही वेळी निराशा हाती लागली. २८व्या मिनिटाला चीनला गोल करण्याची पहिली संधी मिळाली, परंतु गोलरक्षक धीरजने त्यांचा प्रयत्न अपयशी ठरवला.

पहिल्या सत्रात सामना गोलशून्य राहिला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी कडवी टक्कर दिली, परंतु निर्धारित वेळेत त्यांना गोलशून्य बरोबरीवरच समाधान मानावे लागले. तीन मिनिटांच्या भरपाई वेळेत मात्र चीनने मिळालेल्या संधीचे सोने करताना विजय खेचून आणला.

 

बेंटेकचा वेगवान गोल!

८.१ सेकंदात नोंदवला गोल; बेल्जियमचा विजय

अ‍ॅमस्टरडॅम : ख्रिस्टियन बेंटेकने विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पध्रेत सर्वात वेगवान गोलची नोंद करताना बेल्जियमला ‘ह’ गटातील सामन्यात जिब्राल्टरवर ६-० असा विजय मिळवून दिला. बेंटेकने ८.१ सेकंदात पहिला गोल करून १९९३ साली सॅन मॅरिनोच्या डेव्हिडे गुआल्टीएरीच्या (८.३ से.) नावावर असलेला विक्रम ०.२ सेकंदाच्या फरकाने मोडला. दुसऱ्या

लढतीत पोर्तुगालने ६-० फॅरोए आईसलँडवर विजय मिळवला, तर टीकेचा धनी ठरलेल्या पॉल पोग्बाने निर्णायक गोल नोंदवत फ्रान्सला विजय मिळवून दिला.

बेल्जियम आणि जिब्राल्टर यांच्यातील सामन्यात बेल्जियमला विजयाचे दावेदार मानले जात होते. त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल असेच चित्र होते. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला त्याचा प्रत्यय आला. बेंटेकने ८.१ सेकंदात गोल नोंदवून बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मार्च २०१५ नंतर बेंटेकचा हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला.  त्यापाठोपाठ अ‍ॅलेक्स वित्सेलने (१९ मि.) गोल करून आघाडीत भर टाकली. ४३व्या मिनिटाला बेंटेकच्या दुसऱ्या गोलने पहिल्या सत्रात बेल्जियमने ३-० असे वर्चस्व गाजवले. मध्यंतरानंतर बेल्जियमचा गोलधडाका कायम राहिला. ५१व्या मिनिटाला ड्राएस मेर्टेन्सने गोल केला.

पाच मिनिटानंतर बेंटेकने गोल करून हॅट्ट्रिक पूर्ण केला. बेल्जियमच्या या आक्रमक पवित्र्यासमोर जिब्राल्टरचे खेळाडू पूर्णपणे हतबल झाले होते. ७९व्या मिनिटाला इडन हजार्डने गोलची भर टाकत बेल्जियमचा ६-० असा विजय निश्चित केला.

इतर निकाल

  • फॅरोए आईसलँड ० पराभूत वि. पोर्तुगाल (अँड्रे सिल्व्हा १२, २२ व ३७ मि., ख्रिस्टियानो रोनाल्डो ६५, जो मॉटीन्हो ९० मि., जो सँसेलो ९० मि.)
  • नेदरलँड्स ० पराभूत वि. फ्रान्स (पॉल पोग्बा ३० मि.)
  • स्विडन ३ (ओला टोईव्होनेन ३९ मि., ऑस्कर हिल्जेमार्क ४५ मि., व्हिक्टर निलसन ५८ मि.) वि. वि. बल्गेरिया

 

विश्वचषक स्पध्रेनंतर गेरार्ड पिक्यू निवृत्त होणार

माद्रिद : स्पेनचा बचावपटू गेरार्ड पिक्यूने रशियात २०१८ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेनंतर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा सोमवारी केली. मैदानावरील निराशाजनक कामगिरीबाबत पिक्यूवर सातत्याने टीका होते आहे.

‘‘रशियामध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा ही राष्ट्रीय संघाकडून माझी अखेरची स्पर्धा असेल आणि आशा करतो की पुढील दोन वर्षांत मला खेळण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल,’’ असे मत पिक्यूने व्यक्त केले.

विश्वचषक पात्रता स्पध्रेत स्पेनने २-० अशा फरकाने अल्बानियाचा पराभव करून ‘ग’ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पिक्यूने ही घोषणा केली. ३१ वर्षीय पिक्यू म्हणाला, ‘‘आज घेतलेला निर्णय हा अंतिम नाही. मी त्याबाबत विचार करत होतो. अशी अनेक माणसे आहेत, की ज्यांना मी संघात नको आहे.’’