08 July 2020

News Flash

डाव मांडियेला : कोलदांडा बोली

१९ क्रमांकाच्या या डावात प-पू जोडी व्हल होती, तर उ-द जोडी फ्रेश.

संग्रहित छायाचित्र

डॉ. प्रकाश परांजपे

चित्रातला डाव सप्टेंबर २०१९ मध्ये वुहान इथे झालेल्या ४४व्या जागतिक स्पर्धातील पुरुषांच्या बुजुर्ग गटात कांस्यपदकाकरता झालेल्या सामन्यातला आहे. १९ क्रमांकाच्या या डावात प-पू जोडी व्हल होती, तर उ-द जोडी फ्रेश. डावात घेतलेल्या ठेक्यात फ्रेश असताना १ दस्त कमी झाला तर ५० अंकांचं नुकसान होतं, ठेका जास्त दस्तांनी बुडाला तर ५०च्या पटीत गुण प्रतिस्पर्ध्याना मिळतात. जर प्रतिस्पर्ध्यानी ठेक्याला डबल मारली तर १००-२००-२००-३००-३०० असे गुण प्रतिस्पध्र्यांना मिळतात.  अर्थातच एक ‘डाऊन‘ चे १००, दोन  ‘डाऊन‘ चे १००+२००=३००; तीन  ‘डाऊन‘ चे १००+२००+२००=५००; आणि पुढच्या प्रत्येक कमी पडलेल्या दस्तामागे ३०० असे गुण प्रतिस्पर्ध्याना मिळतात.  तेच जर प-पू जोडीने योग्य तो शतकी ठेका बोलीभाषेतून शोधला तर त्यांना ५०० बक्षीसगुण अधिक १०० किंवा १२० दस्तगुण असे ६००-६२० एकूण गुण मिळू शकतात.  जर त्यांचा डाव छोटा कोट बनविण्याइतपत तगडा असला तर त्याचे ७५० बक्षीसगुण मिळण्याचीही शक्यता असते. मात्र जर योग्य तो हुकूम किंवा ठेक्याची योग्य ती पातळी शोधता आली नाही तर घेतलेला ठेका बुडून फक्त उ-द जोडीलाच स्कोअर मिळतो. यामुळे प्रतिपक्षाला योग्य तो ठेका सहजपणे शोधता येऊ नये म्हणून प्रत्येक जोडीचा प्रयत्न चालू असतो. डावातली चुरस यामुळे वाढते.

अशा प्रकारच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून भारताच्या जितू सोलानी यांनी वरील डावात ३ चौकट ही बोली केली. त्यांच्याकडे चित्रगुण फक्त ९च होते, पण चौकट हुकुमात ६ जवळपास पक्के  दस्त असल्यामुळे जास्तीत जास्त ३ ‘डाऊन’ म्हणजे ५०० चं नुकसान झालं असतं. अशा प्रकारच्या बोलीला इंग्रजीत प्री-एम्प्टिव्ह बोली म्हणतात. आपण त्याला कोलदांडा बोली म्हणू या.

या बोलीमुळे नेदरलँड्सच्या प-पू जोडीची कशी तारांबळ उडाली ते चित्रात दिलेल्या बोलींमधून पाहायला मिळतं. पश्चिमेकडे बदाम पंथ होता तर पूर्वेकडे किलवर. दोघांनी आपापल्या पंथांच्या बोली केल्या पण मुळातच लिलाव ३ पातळीवर चालू झाल्याने कुठला हुकूम ठेवावा याबद्दल त्यांचं एकमत सहजपणे होऊ शकलं नाही.  वाटेवर पश्चिमेच्या खेळाडूने ५ चौकट आणि ५ इस्पिक या बोली करून चांगला डाव दाखवला. (३ चौकटची बोली करून जितू सोलानीने चौकट पंथ दाखवला होता, त्यामुळे पश्चिमेची ५ चौकटची बोली ही साहजिकच ‘नैसर्गिक‘ बोली नव्हती, तर ती एक प्रकारची सांकेतिक बोली होती.)

नेदरलँड्सच्या खेळाडूंचा ६ किलवरचा ठेका एका दस्ताने बुडला आणि भारताला १०० गुण मिळाले. दुसऱ्या पटावर भारताच्या खेळाडूंनी या डावात प-पू दिशेला खेळताना ४ बदामचा सुरक्षित ठेका खेळून ६५० गुण  मिळवले. ८० डावांची ही लढत भारताने सहजपणे  जिंकून कांस्यपदक मिळवलं!

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 3:00 am

Web Title: bridge game article koldanda dialect abn 97
Next Stories
1 Happy Birthday Jinx : विराटकडून अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 रोहितच्या तिसऱ्या द्विशतकादरम्यान पत्नी झाली होती भावूक, कारण…
3 राहुल द्रविडने उधळली विराटवर स्तुतीसुमनं, म्हणाला…
Just Now!
X