डॉ. प्रकाश परांजपे

नोव्हेंबर १९२७ पासून अमेरिकेच्या आकाशवाणीने ब्रिज खेळावर एक लोकप्रिय मालिका सादर केली. चार प्रसिद्ध खेळाडू वेगवेगळे आधीच वाटून ठेवलेले डाव खेळले. देशातील ५०-६० रेडिओ केंद्रांनी या खेळाचं धावतं वर्णन प्रसारित केलं.  गावोगावच्या वृत्तपत्रांनी या डावातली पानं आपापल्या अंकात छापली. कित्येक ब्रिजपटूंना अमेरिकेत १९२०-३० च्या दशकात अमाप लोकप्रियता लाभली. त्यातील एक मिल्टन वर्क याचा हा डाव-

विस्तारभयास्तव डावातल्या बोली दिलेल्या नाहीत. ३बिहू हा ठेका दक्षिणेला बसलेला वर्क खेळत होता. पश्चिमेच्या खेळाडूने बदाम तिरीच्या उतारीने खेळाची सुरुवात केली. बदाम एक्क्याने पहिला दस्त जिंकून लेंझ बदाम दश्शी खेळला. वर्क यावर छोटं पान खेळला आणि बदाम दश्शी हा दस्त जिंकली. लेंझकडली बदामची पानं आता संपली होती. तिसऱ्या दस्ताला तो चौकट पंजी खेळला. बिहू ठेक्याविरुद्ध बचाव करताना आपल्याकडील लांबलचक पंथाच्या चौथ्या पानाची उतारी करावी हा दंडक १९२० च्या दशकातही प्रचारात होता, आजही तो तसाच वापरला जातो.

वर्कने तिसरा दस्त चौकट एक्क्याने जिंकून किलवर राजा राणी वाजवले. उ-द जोडीकडे किलवरची एकूण  ५+३ अशी आठ पानं  होती, म्हणजे गावात १३-८= पाच पानं. या पाच पानांची विभागणी ३-२ अशी असती तर वर्क महाशयांना किलवरचे पाच दस्त मिळाले असते, आणि इस्पिक एक्का आणि चौकट एक्का-राजा-राणी हे तीन धरून ठेका सहज वटला असता; पण दुसऱ्या किलवरवर जेव्हा लेंझने एक इस्पिक जाळलं तेव्हा या गणिताचा बोजवारा उडाला.

आत्तापर्यंतच्या खेळावरून त्याच्या हे लक्षात आलं होतं की, पश्चिमेकडे पाच बदामची पानं होती आणि चार किलवरची. पूर्वेच्या चौकट पंजीच्या खेळावरून बहुधा त्याच्याकडे सुरुवातीला पाच पानी चौकट पंथ असावा असं दिसत होतं, म्हणजे पश्चिमेकडे तीन असावीत, असं त्याने ताडलं. यावर आधारित एका सुंदर योजनेची त्याने आखणी केली. सहावा दस्त चौकट राणीने जिंकून तो हातातून इस्पिक खेळला. बघ्याच्या इस्पिक एक्क्याने तो दस्त जिंकून त्याने चौकट राजाही वाजवला आणि किलवर एक्का जिंकून तो चौथं किलवरचं पान खेळला आणि पश्चिमेच्या गळ्यात पडला. दहाव्या दस्ताला पश्चिम जेव्हा किलवर गुलामाने दस्त जिंकला तेव्हा त्याच्याकडे फक्त बदामची पानंच शिल्लक उरली होती.  जर वर्कने बदाम पंथाला या स्थितीत हात घातला असता तर पश्चिमेचे तीनही हात झाले असते, पण राजा-गुलाम-९ अशी तगडी पानं हातात असूनही पश्चिमेला नाइलाजाने राजा खेळावा लागला. त्यावर वर्क छोटं पान खेळला आणि शेवटचे दोन दस्त वर्कने बदाम राणी आणि सर झालेल्या किलवरच्या पाचव्या पानाने जिंकले आणि ठेका यशस्वीरीत्या पूर्ण केला.

१९२७ साली देशभर छापल्या गेलेल्या डावातील पानं आधीच बघून हे खेळाडू रडीचा डाव खेळतील अशी शंकासुद्धा कोणाला आली नसावी बहुधा. मात्र गेल्या काही दशकांत संशयकल्लोळ हा ब्रिज जगताचा स्थायिभाव झाला आहे.  ब्रिजची लोकप्रियता कमी का झाली त्याचं कारण कदाचित यातच दडलेलं असेल.

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com