News Flash

भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे दीपस्तंभ!

मिल्खा यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले.

धावपटू पी. टी. उषाकडून मिल्खा सिंग यांच्या स्मृतींना उजाळा

पीटीआय, चेन्नई

महान क्रीडापटू मिल्खा सिंग यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. त्यामुळे निधनानंतरही कोटय़वधी भारतीयांच्या मनात त्यांचे स्थान कायम राहील, अशा शब्दांत भारताची माजी धावपटू पी. टी. उषाने मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली. मिल्खा यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. उषालासुद्धा १९८४मध्ये अशाच प्रकारे कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. मिल्खा यांच्या निधनापश्चात व्याकूळ मनाने उषाने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘‘१९८२मध्ये मी मिल्खा जी यांना प्रथमच भेटले. ते मला ‘पीटी’ म्हणून हाक मारायचे. स्वत:चा अधिकाधिक विकास करायचा असल्यास विदेशातील स्पर्धामध्ये सहभागी हो आणि तेथे उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल कर, असे ते नेहमी सांगायचे. कारकीर्दीत कोणत्याही क्षणी अडचण आली, तरी ते सदैव साहाय्य करण्यासाठी तयार असायचे,’’ असे उषा म्हणाली.

‘‘कालिकत येथून पतियाळासाठी प्रवास करत असतानाच मला मिल्खा यांच्या निधनाची बातमी कळाली. त्यामुळे मला भावनांवर नियंत्रण राखणे कठीण गेले. १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी केलेली कामगिरी माझ्यासह असंख्य भारतीयांना प्रेरणा देणारी ठरली. त्यांची जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगी होती. मिल्खा यांच्या निधनामुळे आपण भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील मौल्यवान हिरा गमावला,’’ असेही उषाने सांगितले.

ल्ल मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण एका महान व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. असंख्य भारतीय नागरिकांच्या हृदयात त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले, त्या वेळी हाच आमचा अखेरचा संवाद असेल याची कल्पना नव्हती. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळावे, ही ईश्वराकडे प्रार्थना!

– नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

  • भारताने तारा गमावला आहे. मिल्खा सिंग आपल्याला सोडून गेले असले, तरी ते नेहमीच प्रत्येक भारतीयाला देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रेरणा देत राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना!

– किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

  • भारताच्या ‘फ्लाइंग सिख’ यांना भावपूर्ण आदरांजली. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे सर्व भारतवासीयांच्या मनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची कामगिरी भविष्यातही अनेक पिढय़ांना प्रेरणा देत राहील.

– सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू

  • मिल्खाजी, मी तुम्हाला कधीही प्रत्यक्षात धावताना पाहिले नाही. परंतु लहान वयापासूनच जेव्हाही मी धावायचो, तेव्हा सर्वजण मिल्खा यांच्याप्रमाणे धावला, असेच म्हणायचे. यावरूनच तुमची महानता सिद्ध होते. तुमची प्रत्येक धाव अनेकांना ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी बळ द्यायची. तुमच्या आत्म्यास शांती लाभो, हीच इच्छा!

– सुनील छेत्री, भारताचा फुटबॉलपटू

  • जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर मिल्खासरांनी माझ्याशी स्वत:हून दूरध्वनीद्वारे संवाद साधला. त्यांनी माझ्या कामगिरीचे कौतुक करतानाच भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याची माझ्यात क्षमता असल्याचे सांगितले. मिल्खा सर, तुमचे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन!

– हिमा दास, भारताची धावपटू

  • मिल्खा सिंग यांच्यासारखा धावपटू कधीच घडू शकणार नाही. भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा वारसा यापुढेही कायम राहील. मिल्खा यांना भावपूर्ण आदरांजली!

– आदिल सुमारीवाला, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष

  • मिल्खा सिंग यांचे फक्त शरीर आपल्याला सोडून गेले आहे. परंतु कधीही धैर्य, सामर्थ्यांचा उल्लेख केला जाईल, तेव्हा मिल्खा यांचे नावच सर्वप्रथम लक्षात येईल. भारताच्या सर्वकालीन महान क्रीडापटूला भावपूर्ण आदरांजली!

– वीरेंद्र सेहवाग, भारताचा माजी क्रिकेटपटू

  • मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. भारतासाठी अभिमानास्पद असे उत्तम व्यक्तिमत्त्व आणि सवरेत्कृष्ट क्रीडापटू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मिल्खा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते

  • आदरणीय मिल्खा सिंग, तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुमच्यासोबत घालवलेल्या क्षणांमुळेच मला कधीही हार न मानण्याची सवय लागली. अनेकांसाठी तुम्ही प्रेरणास्रोत होता, परंतु माझ्या आयुष्यात तुमचे वडिलांप्रमाणे स्थान होते. तुम्ही कायम माझ्या हृदयात राहाल!

– फरहान अख्तर, अभिनेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:40 am

Web Title: brighten memories milkha singh athletic p t usha ssh 93
Next Stories
1 रॉड्रिगेजमुळे अर्जेटिनाची बलाढय़ उरुग्वेवर मात
2 जर्मनीला स्वयंगोलने तारले!
3 स्नेह राणाच्या झुंजार अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत
Just Now!
X