ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम ब्रिस्बेन कसोटीत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची संघात निवड करायला पाहिजे होती, असे मत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केले आहे. ब्रिस्बेन कसोटीसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे कुलदीप यादव निराश झाला असेल, असे अजित आगरकरने म्हटले आहे.

याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कुलदीप यादवला फक्त एका वनडेमध्ये आणि सिडनीमधील सराव सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

आणखी वाचा- IND vs AUS: लाबूशेनचं दमदार शतक; नवख्या नटराजनचे दोन बळी

संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांच्यावर विश्वास दाखवला. आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी या प्रमुख खेळाडूंविना भारतीय संघ चौथ्या कसोटीत उतरला आहे. हे सर्वजण दुखापतग्रस्त आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती. त्यात कुलदीप यादवचे महत्त्वपूर्ण योगदान होते. परदेशातील खेळपट्टयांवर त्याने चांगली गोलंदाजी केली आहे.

आणखी वाचा- DRS घेण्यावरुन पंतचा रहाणेकडे ‘बालहट्ट’, रोहितलाही आवरलं नाही हसू; बघा व्हिडीओ

“कुलदीप यादव खूप निराश झाला असेल. तो भारताचा नंबर एक फिरकी गोलंदाज होता. तुम्ही पाच गोलंदाजांसह खेळताय. जाडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आलाय. मग संघात आणखी एक फिरकी गोलंदाज का नको? गोलंदाजीत एक संतुलन आले असते. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळणार नसेल, तर फिरकी गोलंदाजी उपयुक्त ठरु शकते” असे अजित आगरकर म्हणाला.