अद्भुत आणि अविश्वसनीय वाटावे अशा देदीप्यमान २४ वर्षांच्या खंडप्राय कारकिर्दीनंतर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला. २००व्या आणि शेवटच्या कसोटीनंतर त्याने केलेल्या निरोपाच्या भाषणाने जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. जागतिक क्रिकेटला भरीव योगदान देणाऱ्या सचिनचा इंग्लिश प्रसारमाध्यमांनीही यथोचित गौरव केला आहे.
इतक्या उत्कटपणे खेळातून निवृत्ती घेण्याचा हा अपवादात्मक क्षण आहे. सचिनच्या निरोपाच्या भाषणाने लाखो चाहत्यांना आपला हुंदका आवरला नाही अशा शब्दांत ‘द डेली टेलीग्राफ’ने सचिनला सन्मानित केले आहे.
शेवटच्या सामन्यात त्याची कामगिरी सर्वोत्तम व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याचे शतक झाले नाही मात्र अतिशय हृदयस्पर्शी भाषणाने त्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली असे या दैनिकाने पुढे म्हटले आहे. ‘२२ यार्डात विस्तारलेली २४ वर्षांची कारकीर्द’ अशा चपखल शब्दांत त्याने आपल्या कारकिर्दीचे वर्णन केले. सचिनच्या मागे असणारे चाहत्यांचे अफाट प्रेम आणि त्याला या प्रेमाची असलेली जाण वानखेडे मैदानावर सातत्याने सिद्ध झाली. भावनाविवश असतानाही अतिशय सुयोग्य शब्दांत, कारकिर्दीला योग्य वळण देणाऱ्या प्रत्येकाचा उल्लेख असणारे भाषण करणे ही विलक्षण गोष्ट असल्याचे टेलिग्राफने पुढे म्हटले आहे.
मैदानावर आणि मैदानाबाहेरही आचरण कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठ सचिनने अन्य खेळाडूंना दिला अशा शब्दांत ‘द गार्डियन’ने सचिनला गौरवले आहे. तेंडुलकरच्या दिमाखदार कारकिर्दीने भारताचीही ओळख निर्माण झाली. सर्वसामान्य वातावरणात जन्मलेल्या आणि मोठे झालेल्या सचिनने कमावलेले यश हे अन्य क्रीडापटूंसाठी एक जिवंत उदाहरण ठरले आहे. पैसा, प्रसिद्धी सगळं मिळूनही सचिनचे पाय जमिनीवरच राहिले. गर्वाचा, वृथा अहंकार कधीही त्याच्या वागण्यात डोकावला नाही. तो कायम नम्र आणि खऱ्या अर्थाने जंटलमन राहिला. त्याच्या लोकप्रिय होण्याचे हे प्रमुख कारण आहे.
क्रमवारीतील १८व्या स्थानावरून
 सचिन कसोटीतून निवृत्त
दुबई : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या विक्रमी २००व्या कसोटीनंतर शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पण निवृत्तीच्या वेळी सचिन आयसीसी कसोटी क्रमवारीत १८व्या स्थानावर होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सचिन २४व्या स्थानी होता. १९९२नंतर प्रथमच सचिन इतक्या खालच्या क्रमांकावर पोहोचला होता. पण मुंबईतील अखेरच्या कसोटीत ७४ धावांची खेळी करणाऱ्या सचिनच्या क्रमवारीत पाच क्रमांकांनी सुधारणा झाली. फलंदाजीत चेतेश्वर पुजाराने सर्वोत्तम सहावे स्थान पटकावले आहे. विराट कोहली २१व्या, तर मुरली विजय ४२व्या क्रमांकावर आहे.