जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला ब्रिटिश टेनिसस्टार अँडी मरे याने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. कमरेच्या दुखापतीमुळे त्याला अधिक काळ टेनिस खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही त्याची शेवटची स्पर्धा असेल असे संकेत त्याने दिले. शुक्रवारी त्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेला मरे याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान कमरेच्या दुखापतीने हैराण केल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याने लंडनच्या क्वीन्स क्लब स्पर्धेतून पुनरागमन केले. पुढे तो केवळ चार स्पर्धांमध्ये खेळू शकला. सप्टेंबरमध्ये त्याने पुन्हा विश्रांती घेतली आणि आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवले. पण त्यानंतर बिसबेनमध्ये झालेल्या स्पर्धेत तो दुसऱ्याच फेरीत स्पर्धेबाहेर फेकला गेला. अखेर स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याच्याविरुद्धच्या सराव सामन्यानंतर लगेचच त्याने निवृत्तीचे संकेत दिले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झाल्यावर तो निवृत्त होणार असलयाचे त्याने स्पष्ट केले.

माझ्या खेळावर आता मर्यादा आल्या आहेत. त्या मर्यांदांसह मी टेनिस खेळू शकेन. पण त्या परिस्थितीत मी खेळाचा आनंद लुटू शकणार नाही. खरं पाहता विम्बल्डन स्पर्धा खेळून मला निवृत्ती घ्यायची आहे. पण तोवर मी खेळू शकेन याची मला शाश्वती वाटत नाही. मी तंदुरुस्त होण्यास खूप प्रयत्न केले. पण आता खेळाचा ताण मला सहन होणे शक्य नाही, असे सांगत त्याने जवळपास निवृत्तीची घोषणा केली.