ब्रुनो फर्नाडेसने पेनल्टीवर केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर मॅँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमधील टॉटनहॅमविरुद्धची लढत १-१ बरोबरीत सोडवता आली. करोनाच्या काळात फुटबॉलला सुरुवात झाल्यावर मॅँचेस्टर युनायटेडने पहिल्याच लढतीत पराभव टाळण्यात फर्नाडेसच्या महत्त्वपूर्ण गोलमुळे यश मिळवले.

पॉल पोग्बाचेही मॅँचेस्टर युनायटेडच्या बरोबरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिले. डिसेंबरपासून पोग्बा एकही लढत खेळला नव्हता. टॉटनहॅमविरुद्धच्या लढतीतही ६३ व्या मिनिटाला बदली म्हणून त्याला पाठवण्यात आले. त्यावेळेस टॉटनहॅम १-० आघाडीवर होता. २७ व्या मिनिटाला स्टीवन बर्गविनने यजमान टॉटनहॅमला आघाडी मिळवून दिली होती. मात्र पोग्बाने सुरुवातीपासून प्रभाव पाडत आक्रमकता दाखवली. पोग्बाचे युनायटेडकडूनचे भवितव्यदेखील अधांतरी असल्याचे बोलले जात आहे. मात्र पोग्बाला टॉटनहॅमच्या एरिक डायरने पाडले आणि तिथेच युनायटेडला पेनल्टीची संधी मिळाली. फर्नाडेसने त्यावर गोल केला. युनायटेडशी जानेवारीमध्ये करारबद्ध झाल्यापासून फर्नाडेसचा हा पेनल्टीवरील तिसरा गोल ठरला.

मॅँचेस्टर युनायटेड ३० सामन्यांतून ४६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. चेल्सी २९ सामन्यांतून ४८ गुणांसह चौथ्या स्थानी असून त्यांच्याकडे एक अतिरिक्त लढत आहे.

लिस्टर सिटीची लढत बरोबरीत

लिस्टर सिटीला शनिवारी १६व्या स्थानावरील वॉटफर्डने १-१ बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे लिस्टर सिटीचे तिसरे स्थान धोक्यात आहे. या लढतीत लिस्टरकडून ९०व्या मिनिटाला बेन शिलवेलने गोल करत निर्णायक आघाडी मिळवली होती. मात्र ‘इंज्युरी टाइम’मध्ये वॉटफर्डकडून क्रेग डॉसनने गोल करत बरोबरी साधली.

बार्सिलोनाला सेव्हिलाने बरोबरीत रोखले

बार्सिलोना : करोनाच्या काळात फुटबॉल पुन्हा सुरू झाल्यावर बार्सिलोनाला प्रथमच बरोबरी स्वीकारावी लागली आहे. बार्सिलोनाला घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सेव्हिलाने गोलशून्य बरोबरीत रोखले. बार्सिलोनाची लढत बरोबरीत सुटल्याने रेयाल माद्रिदला अव्वल स्थान पटकावण्याची संधी प्राप्त झाली आहे. बार्सिलोनाचे ३० सामन्यांत ६५ गुण असून रेयाल माद्रिदचे २९ सामन्यांत ६२ गुण आहेत. रेयाल माद्रिदची रविवारी रेयाल सोशायदादशी लढत आहे. ही लढत जर रेयाल माद्रिदने जिंकली तर त्यांना बार्सिलोनासोबत ६५ गुणांची बरोबरी करता येईल. बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीला या सामन्यात गोल करता आला नाही.