सामानाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची शर्यत रंगलेली तुम्ही कधी पाहिली आहे का? पण आता ट्रकचा हा वेगवान थरार पहिल्यांदाच अनुभवण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर २३ मार्चपासून होणाऱ्या टाटा मोटर्स टी-१ प्रायमा ट्रक रेसिंग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान १२ ट्रक ड्रायव्हर्समध्ये जेतेपदासाठी शर्यत रंगणार आहे. गेली तीन वर्षे इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे आयोजित करणारे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आता अन्य प्रकारच्या शर्यतींसाठीही उपलब्ध झाले आहे.
सात टन सामान वाहून नेण्याची क्षमता असलेले ट्रक चालवण्यासाठी ब्रिटिश ट्रक रेसिंग अजिंक्यपद शर्यत आणि युरोपियन ट्रक रेसिंग अजिंक्यपद शर्यत या दोन स्पर्धामधून आंतरराष्ट्रीय ट्रक ड्रायव्हर्सची निवड करण्यात आली आहे. या शर्यतींसाठी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर २.१ किलोमीटरचा ट्रॅक बनवण्यात आला असून ताशी ६० ते ११० कि.मी. वेग मिळणार आहे. एक फेरी २ मिनिटे १० सेकंदांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ९० लिटर इंधनक्षमता असलेल्या या ट्रकच्या शर्यतीसाठी सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाणार आहे.
अशा प्रकारच्या शर्यती फक्त युरोप, ब्रिटन आणि अमेरिकेत आयोजित केल्या जातात. पण आशियात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच भारतात होत आहे. अशा शर्यतींचा अनुभव असलेल्या परदेशातील निष्णात ट्रक ड्रायव्हर्सना या शर्यतीसाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र भविष्यात या शर्यतीसाठी भारतातील नियमित ट्रकचालक असलेल्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
२३ मार्चपासून शर्यतीला सुरुवात
१२ ड्रायव्हर्समध्ये जेतेपदासाठी चुरस
ताशी ६० ते ११० किमी. वेग मिळण्याची अपेक्षा