२०१९ साली सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा २०१८ सालचा अर्थसंकल्प आज लोकसभेत मांडला. या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटलींनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयासाठी २१९६.३५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये २५८.१९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षात क्रीडा मंत्रालयासाठी अर्थमंत्र्यांनी १९४३.२१ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आलेल्या काही प्रमुख गोष्टी –

  • भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच ‘साई’ला राष्ट्रीय शिबीरांच्या आयोजनासाठी ४२९.५६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा या रकमेत कपात करण्यात आलेली आहे, २०१७ साली अर्थमंत्रालयाने ‘साई’ला ४८१ कोटींचा निधी दिला होता.
  • The National Youth Corps संस्थेसाठी यंदा ८० कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी ही रक्कम ६० कोटी इतकी होती.
  • क्रीडा प्राधिकरणांचा दर्जा सुधारण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीच्या रकमेतही यंदा वाढ करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी ३०२.१८ कोटी रुपयांची तरतूद केलेल्या जेटलींनी यंदा क्रीडा प्राधिकरणांसाठी ३४२ कोटींची तरतूद केली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असलेल्या ‘खेलो इंडिया’ प्रोजेक्टला जेटलींच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद मिळालेली आहे. या योजनेसाठी जेटलींनी ५२०.९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
  • नेहरु युवा केंद्र संघटनेलाही यंदा २५५ कोटी रुपयांचा भरघोस निधी देण्यात आलेला आहे.
  • क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या बजेटमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ. यंदा जेटलींकडून क्रीडा विभागासाठी १९३५.१५ कोटींची तरतूद. मागच्या वर्षी ही रक्कम १७१२.०६ एवढी होती.
  • ईशान्येकडील राज्यातील क्रीडाविषयक सुविधांना मदत करण्यासाठी १७३.१६ कोटी रुपयांची तरतूद
  • मात्र जम्मू-काश्मिर राज्यासाठी करण्यात येणाऱ्या विशेष तरतूदींमध्ये जेटलींकडून कपात. मागच्या वर्षीच्या तुलनेत जम्मू काश्मिरच्या बजेटमध्ये २५ कोटींची कपात करुन यंदा जम्मू काश्मिरला फक्त ५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. मागच्या वर्षी ही रक्कम ७५ कोटी इतकी होती.

आगामी राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई खेळ आणि टोकीयो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सध्या तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली भरीव तरतूद ही आश्वासक मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘खेलो इंडिया’च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान क्रीडापटूंना चांगली कामगिरी करण्यासाठी पूर्णपणे पाठींबा दर्शवला होता.