करोनानंतरच्या काळात चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई असल्याने यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पर्याय उपाय शोधणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केली.

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने गेल्या आठवडय़ात ‘आयसीसी’ला चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करणे धोकादायक असल्याचे सुचवले होते. त्यानुसार ‘आयसीसी’ने खबरदारी म्हणून मार्गदर्शक तत्त्वांची यादी जाहीर केली. त्यामुळे करोनानंतरच्या काळात गोलंदाजांना चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई आहे. बुमराने मात्र माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि शॉन पोलॉक यांच्याशी ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’च्या माध्यमातून साधलेल्या संवादादरम्यान ‘आयसीसी’ या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

‘‘एखाद्या सामन्यात बळी मिळवल्यावर संघ सहकाऱ्याला आलिंगन देणे अथवा हस्तांदोलन किंवा टाळी मारून आनंद साजरा करणे, यावर मी नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. परंतु चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करता आला नाही, तर नक्कीच माझ्यासह अनेक गोलंदाजांसाठी समस्या निर्माण होईल,’’ असे २६ वर्षीय बुमरा म्हणाला.

‘‘त्यामुळे ‘आयसीसी’ने या निर्णयाविषयी विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा चेंडूला लकाकी देण्यासाठी पर्यायी उपाययोजना करावी. गोलंदाजांसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट अधिक आव्हानात्मक आहे. त्यातच कसोटी सामन्यांतही जर चेंडूला आम्हाला लकाकी देता आली नाही, तर गोलंदाजांना संघासाठी फारसे योगदान देता येणार नाही,’’ असेही बुमराने सांगितले. त्याचप्रमाणे स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात करण्यापूर्वी खेळाडूंसाठी किमान एक ते दोन आठवडे सरावाची सोय करावी, असेही बुमराने सुचवले.