जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे निर्णायक षटकांत अचूक मारा करणारे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले.

‘बुमराह आणि भुवनेश्वरच्या रूपाने आमच्याकडे दोन सवरेत्कृष्ट गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली भेदक गोलंदाजी पाहता दोघांचेही कौतुक करायला हवे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत आहे, त्यांच्याकडे बरेच आक्रमक फलंदाज आहेत. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यामुळे भारताला मोठय़ा फरकाने मालिका जिंकण्यात यश आले. न्यूझीलंडविरुद्धही भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. ग्रीन पार्क खेळपट्टीवर रविवारी ४ षटकांत ३५ धावा करणे, शक्य होते. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने अचूक मारा करताना किवींना विजयापासून रोखले. केवळ न्यूझीलंडविरुद्ध नाही तर मागील काही सामन्यांत दडपण असूनही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना विजयात मोलाचे योगदान दिले आहे,’’ असे रोहितने सांगितले.

कानपूरमधील तिसरी एकदिवसीय लढत जिंकून भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली.‘मुंबईतील पहिल्या वनडेत आम्हाला २०-२५ धावा कमी पडल्या. मात्र मागील दोन्ही वनडेत खेळ उंचावला. पिछाडी भरून काढताना क्रिकेटपटूंनी दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे,’ असे रोहितने सांगितले.