संपूर्ण जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा विश्वालाही बसला. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यासारख्या महत्वाच्या स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयोजकांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. एकीकडे करोनाशी सामना करत असताना संपूर्ण जग आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर्मनीने या दरम्यान एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. फुटबॉल विश्वात मानाचं स्थान असलेल्या Bundesliga स्पर्धेला जर्मन सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

Bundesliga आणि जर्मनीतील दुसऱ्या श्रेणीचे फुटबॉल सामने १६ मे पासून सुरु करण्यासाठी जर्मन सरकारने परवानगी दिली आहे. मात्र हे सर्व सामने रिकाम्या मैदानावर खेळवले जातील, प्रेक्षकांना या सामन्यांना हजर राहता येणार नाही. १६ मे ला स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर २७ जून ला ही स्पर्धा संपेल अशी माहिती Bundesliga चे सीईओ ख्रिस्तिअन सेफर्ट यांनी दिली. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयोजन समिती मैदानात फक्त ५ बदली खेळाडूंना हजर राहण्याची परवानगी देणार असल्याचं समजतंय. याव्यतिरीक्त La Liga ही स्पर्धा ही २० जुलैपासून सुरु करण्याच्या विचार सुरु असल्याचं समजतंय. करोनाच्या प्रादुर्भावानंतर सरकारकडून परवानगी मिळालेली Bundesliga ही पहिली स्पर्धा ठरलेली आहे.