बर्लिन : यंदाच्या बुंडेसलिगा फुटबॉल हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या रॉबर्ट लेव्हानडोवस्कीच्या दोन गोलांमुळे बायर्न म्युनिकने फॉर्च्युना डय़ुसेलडॉर्फवर ५-० दणदणीत विजय मिळवला. अव्वल स्थानी असणाऱ्या बायर्नसमोर लीगमधून बाद होण्याचा धोका असलेल्या डय़ुसेलडॉर्फचा निभाव लागणार नाही हे चित्र स्पष्ट होते.

सुरुवातीपासूनच बायर्नने वर्चस्व राखले. सलग आठव्या विजयाची नोंद करताना बायर्नने सलग आठवे बुंडेसलिगा विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने घोडदौड राखली. अजून या हंगामात पाच लढती बाकी आहेत. बायर्नकडे आता १० गुणांची आघाडी आहे. १६व्या स्थानी घसरलेल्या डय़ुसेलडॉर्फकडून १५व्या मिनिटालाच मॅथियास जॉर्जेनसनने स्वयंगोल केला. त्यानंतर बायर्नकडून बेंजामिन पॉवर्ड (२९वे मिनिट), लेव्हानडोवस्की (४३वे आणि ५० वे मिनिट) आणि अल्फान्सो डेव्हिस (५२वे मिनिट) यांनी गोल केले. यंदाच्या बुंडेसलिगा हंगामात सर्वाधिक २९ गोल करणाऱ्या लेव्हानडोवस्कीला  गेल्या सहा लढतींत डय़ुसेलडॉर्फविरुद्ध गोल करता आला नव्हता.

हर्था संघाने विजयी घोडदौड राखताना ऑग्सबर्गला २-० नमवले. गेल्या चार लढतींत हर्थाने तीन विजय आणि एक बरोबरी साधली आहे.

ब्राझील राष्ट्राध्यक्षांना फुटबॉलची सुरुवात हवीय

रियो दि जानेरो : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांना देशात लवकरच फुटबॉलचे सामने सुरू व्हायला हवे आहेत. जगात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्यांमध्ये ब्राझीलचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये करोनामुळे २७,८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही बोलसोनारो यांना फुटबॉलची सुरुवात हवी आहे.

हंगेरीत मैदानावर प्रेक्षकांना प्रवेश

मिस्कोल्क (हंगेरी) : हंगेरी फुटबॉल मैदानावर काही मोजक्या प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला आहे. करोनानंतर युरोपात फुटबॉलला पुन्हा सुरुवात झाल्यावर प्रेक्षकांना प्रवेश देणारा हंगेरी हा पहिलाच देश ठरला आहे. सामाजिक अंतर राखून मोजक्याच प्रेक्षकांना शनिवार-रविवारी झालेल्या लढतींमध्ये प्रवेश देण्यात आला.