ऑस्ट्रेलियात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यात झालेल्या वित्त आणि जिवीतहानीसाठी निधी उभा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात पाँटींगच्या संघाने एका धावाने विजय मिळवला आहे. पाँटींगच्या संघाने १० षटकांत विजयासाठी दिलेलं १०५ धावांचं आव्हान गिलख्रिस्टच्या संघाला पेलवलं नाही.

अवश्य वाचा – Video : महिला क्रिकेटरच्या विनंतीनंतर सचिन उतरला मैदानात, अन्

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाँटींगच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगर अवघ्या ६ धावा काढून माघारी परतला. कोर्टनी वॉल्श यांनी लँगरचा त्रिफळा उडवला. यानंतर मॅथ्यू हेडन आणि कर्णधार रिकी पाँटींग यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. रिकी पाँटींग दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत ब्रायन लाराने फटकेबाजी करत संघाला १०४ धावांचा टप्पा गाठून दिला. गिलख्रिस्ट संघाकडून गोलंदाजीत कोर्टनी वॉल्श, युवराज सिंह आणि अँड्रू सायमंड्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल गिलख्रिस्टच्या आपल्या डावाची सुरुवात अतिशय आक्रमक पद्धतीने केली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंमध्ये ४९ धावांची भागीदारी झाली. शेन वॉटसन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर गिलख्रिस्टच्या संघाची मधली फळी कोलमडली. ब्रेट लीने ब्रॅड हॉज, युवराज सिंह यांना बाद करत गिलख्रिस्टच्या संघाला धक्का दिला. अखेरच्या फळीत अँड्रू सायमंड्सने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. एका धावाने पाँटींगच्या संघाने सामन्यात बाजी मारली. पाँटींगच्या संघाकडून ब्रेट लीने २ तर ल्यूक हॉजने १ बळी घेतला.