कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला सध्या एका क्रिकेटपटूकडून जोरदार आव्हान मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी इंग्लंडच्या जोस बटलरचा ‘नवा धोनी’ असा उल्लेख केल्यामुळे सोमवारी समाजमाध्यमांवर बटलर आणि धोनी यांच्यातील तुलनेला उधाण आले होते. बटलर हा गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडसाठी विजयवीराची भूमिका चोखपणे बजावत असला तरी लँगरच्या या व्यक्तव्याला अनेकांनी नापसंती दर्शवली आहे. ‘स्वत: बटलरला तो धोनीपेक्षा कमी असल्याची जाणीव आहे’, ‘धोनी गेली १०-१२ वर्षे सामना संपवण्याचे कार्य करत असून बटलर त्याच्यापुढे काहीच नाही’, ‘धोनी हा ‘गॉड’ (देव) असून बटलर हा फक्त ‘गुड’ (चांगला) आहे’ अशा गमतीदार प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटल्या आहेत.