सिंधू, साईप्रणीत यांची दुसऱ्या फेरीत आगेकूच

पीटीआय, ओडेन्से (डेन्मार्क)

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत माजी राष्ट्रकुल विजेता पारुपल्ली कश्यप आणि राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माने सलामीलाच गाशा गुंडाळला. पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत यांनी मात्र दुसरी फेरी गाठली आहे.

कोरिया खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या कश्यपला पुरुष एकेरीत थायलंडच्या सिट्टहीकोम थाम्मासिनकडून १३-२१, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. चालू वर्षांत हैदराबाद आणि व्हिएटनाम खुल्या स्पर्धामध्ये जेतेपद पटकावणाऱ्या सौरभने निराशा केली. नेदरलँडसच्या मार्क कॅलजोऊवने त्याचा १९-२१, २१-११, २१-१७ असा पराभव केला.

महिला एकेरीत जागतिक विजेत्या सिंधूने दिमाखदार सलामी नोंदवताना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का टुनजुंगचा पराभव केला. पाचव्या मानांकित सिंधूला चीन आणि कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लवकर गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र डेन्मार्कच्या स्पर्धेत तिने माजी कनिष्ठ विश्वविजेत्या ग्रेगोरियाला ३८ मिनिटांत २२-२०, २१-१८ अशा फरकाने पराभूत केले. सिंधूने ग्रेगोरियाविरुद्धची विजयी कामगिरी ५-० अशी राखली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूची पुढील फेरीत कोरियाच्या अून सी यंगशी गाठ पडणार आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणीतनेही दुसरी फेरी गाठली. त्याने पहिल्या फेरीत महान बॅडमिंटनपटू लिन डॅनचा ३५ मिनिटांत २१-१४, २१-१७ असा पराभव केला. हैदराबादच्या साईप्रणीतची पुढील फेरीत जपानच्या दोन वेळा विश्वविजेत्या केंटो मोमोटाशी गाठ पडणार आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या मोमोटाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत साईप्रणीतला हरवले होते.

सात्त्विक-चिरागची विजयी सलामी

थायलंड खुल्या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत दिमाखदार सलामी नोंदवली. या जोडीने कोरियाच्या किम गि जंग आणि ली यंग डाई जोडीला ३९ मिनिटांत २४-२२, २१-११ असे नमवले.