भारताची ऑलिम्पिकपटू सायना नेहवालने जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवांनंतर तिने दक्षिण कोरियाच्या युआन जु बेई हिच्यावर २१-११, १७-२१, २१-१३ अशी मात केली. मात्र हा सामना जिंकूनही तिला उपांत्य फेरीत स्थान मिळविता आले नाही.
सायनाला या स्पर्धेतील पहिल्या लढतींमध्ये जपानच्या मिनात्सू मितानी हिच्याकडून हार पत्करावी लागली होती. पाठोपाठ जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू लि झुरूई हिने पराभूत केले होते. २३ वर्षीय खेळाडू सायनाला युआनविरुद्धही विजय मिळविताना झगडावे लागले. हा सामना जिंकला तरी तिचे हे यश उपांत्य फेरी गाठण्यासाठी अपुरे ठरले. साखळी गटात मितानी, सायना व जु बेई यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. स्पर्धेच्या नियमानुसार साखळी गटात खेळाडूंचे समान गुण झाल्यास बाद फेरीतील प्रवेशाकरिता त्यांच्या सामन्यातील गुणांचा आधार घेतला जातो. त्यानुसार जु बेई हिने सायना व मितानी यांना मागे टाकले. साखळी गटात मितानी हिला झुरूई हिच्याकडून ११-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीतील सातव्या क्रमांकावरील खेळाडू जु बेई हिने तिला झुंजविले. पहिल्या गेममध्ये ६-६ अशा बरोबरीनंतर सायना हिने सलग सहा गुण घेतले. त्यानंतर सायनाने मारलेला परतीचा फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे तिची सलग गुणांची मालिका खंडित झाली. परंतु तिने आघाडी कायम राखली. तिच्याकडे १५-७ अशी आघाडी होती. जु बेई हिने सलग तीन गुण घेत उत्सुकता निर्माण केली. तथापि, सायनाने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत जु बेईला फारशी संधी दिली नाही. हा गेम तिने २१-११ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. जु बेईने ११-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला, मात्र तिच्या या फटक्यांनाही प्रत्युत्तर लाभले. जु बेईने १५-१२ अशी आघाडी घेतली. सायनाने ही आघाडी थोपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये तिला यश मिळाले नाही. जु बेईने आघाडी कायम ठेवत हा गेम जिंकला.
१-१ अशा बरोबरीमुळे तिसऱ्या गेमबाबत उत्कंठा निर्माण झाली. निर्णायक गेममध्ये सायनाने ४-० अशी आघाडी घेत झकास सुरुवात केली. ही आघाडी तिने ८-४ अशी वाढविली. जु बेईने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये तिला यश मिळाले नाही. सायनाने आघाडी कायम ठेवत तिसऱ्या गेमसह सामनाही जिंकला.
सायना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार
नवी दिल्ली : खराब फॉर्ममुळे २०१३ वर्षांत एकही जेतेपद पटकावू न शकलेली सायना नेहवाल आता स्थानिक स्पर्धेत आपले नशीब आजमवणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर सायना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची चिन्हे आहेत. २००७मध्ये सायना राष्ट्रीय स्पर्धेत शेवटची खेळली होती. सायनाशिवाय पी.व्ही.सिंधू, पारुपल्ली कश्यप यांनी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सायनाने आपल्या नावाची प्रवेशिका संयोजकांकडे पाठवली आहे. नवी दिल्लीत १६ डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणाऱ्या या स्पध्रेत पाच विविध प्रकारांतील जेतेपदांसाठी एकूण ३३३ बॅडमिंटनपटू शर्यतीत आहेत.