अखेरच्या साखळी लढतीत यामागुचीवर सहज विजय

सुपर सीरिज मालिकेतील अंतिम टप्पा जिंकण्याच्या निर्धाराने उतरलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने दुबई बॅडिमटन सुपर सीरिजमधील अपराजित्व राखले. तिने जपानच्या अकेनी यामागुचीवर २१-९, २१-१३ असा सहज विजय नोंदवला. साखळी गटातील तिचा हा तिसरा विजय आहे.

सिंधूने साखळी गटातील दुसरा सामना जिंकून यापूर्वीच उपांत्य फेरी निश्चित केली होती. यामागुचीविरुद्ध दोन्ही गेम्समध्ये तिने सुरुवातीपासून चतुरस्र खेळ करीत वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये प्रारंभापासूनच तिने उंचीचा फायदा घेत खोलवर परतीचे फटके मारले. तसेच तिने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. तिने मिळवलेली आघाडी तोडण्यात यामागुचीला यश मिळाले नाही. तिने सिंधूच्या बॅकहँडवर परतीचे फटके मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सिंधूने तिला आक्रमक फटक्यांपासून वंचित ठेवले. त्यामुळे यामागुचीचे डावपेच असफल ठरले.

पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधूचा आत्मविश्वास उंचावला. तिने दुसऱ्या गेममध्येही स्मॅशिंगचे खणखणीत फटके व अचूक सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ केला. तिने यामागुचीच्या बॅकहँडवर अधिकाधिक फटके मारत तिचा बचाव निष्प्रभ केला. यामागुचीला सिंधूच्या चुकांचा थोडासा लाभ मिळाला, मात्र तिला सिंधूची आघाडी मोडून काढण्यात यश मिळाले नाही.

सिंधूने गटातील पहिल्या लढतीत चीनच्या हेइ बिंगजिआ आणि दुसऱ्या सामन्यात जपानच्या सायको सातोवर शानदार विजय मिळवला होता.